लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा मार्गावर प्रजापती चौकात निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कारने धडक देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारवाई करण्याऐवजी प्रकरण शांत करण्याची भूमिका घेण्यात आल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.निवडणुकीच्या काळात शहरातील प्रमुख मार्गावर तपास पथक तैनात करण्यात आले आहेत. भंडारा मार्गावर प्रजापतीनगर चौकात अस्थायी पोलीस चौकी तयार करून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. नंदनवन ठाण्यातील हवालदार सुनील शिंदे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, कार क्रमांक सी. बी. १६, सी. एल.-७००७ तेथून जात होती. निवडणूक अधिकारी आणि सुनील शिंदे यांनी कारला थांबविण्याचा इशारा केला. चालकाने कार वेगाने शिंदे यांच्याकडे नेली. कारला आपल्याकडे वेगाने येताना पाहून शिंदे यांनी पाय मागे घेतले. हे दृश्य पाहून शिंदे यांचे सहकारी कारजवळ आले. कारमध्ये एच. बी. टाऊन येथील रहिवासी पारस सुभाषचंद्र जैन होता. कारचे काच खाली करून त्याने शिंदेसोबत वाद घातला. शिंदेवर शिवीगाळ केल्याचा आरोप लावला. शिंदेच्या बाजूने अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उभे होते. खोटे आरोप लावल्यामुळे ते सुद्धा हैराण झाले. तेथे उपस्थित व्हिडीओग्राफरने या प्रसंगाची शुटींग केली. पारसने आपल्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांने शिंदे यांना पारसला सहकार्य करण्यास सांगितले. परंतु त्यानंतरही त्याची वागणूक न बदलल्याने शिंदे यांनी वरिष्ठांना सूचना दिली. शिंदे आणि त्यांचे सहकारी पारससोबत वाठोडा ठाण्यात पोहोचले. शिंदे यांनी घटनेची तक्रार दाखल केली. पारसचे सहकारीही ठाण्यात पोहोचले. ते शिंदेची माफी मागत होते. दीड तास वाठोडा ठाण्यात गोंधळ सुरू होता. याप्रकरणी काहीच कारवाई न झाल्यामुळे पोलिसात असंतोष निर्माण झाला आहे.
नागपुरात पोलिसाच्या अंगावर कार चालविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:13 AM
भंडारा मार्गावर प्रजापती चौकात निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कारने धडक देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला.
ठळक मुद्देभंडारा मार्गावरील घटना : कारवाई न झाल्यामुळे पोलिसांमध्ये असंतोष