नागपूर : उत्साह, आनंदाची पर्वणी असलेल्या दिवाळीत कुठलेही गालबोट लागू नये याची सावधगिरी प्रत्येकाने बाळगायला हवी. दिवाळीची खरेदी करायची असेल, पर्यटनाला जायचे असेल, बाहेरगावी जायचे असेल तर घराच्या सुरक्षेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दिवाळीच्या काळात घर बंद असल्याने चोरटे सावज साधतात. या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यामुळे सावधान.
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट कल्चर वाढले आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घरात काय घडते, याची माहितीसुद्धा नसते. त्यामुळे चोरटे फ्लॅटवर लक्ष ठेवून असतात. तुमच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा गार्ड नसेल किंवा बाहेरून येणाऱ्याची विचारणा होत नसेल तर चोरट्यांसाठी ही सुवर्ण संधीच असते. रहिवासी वस्त्यांमध्येही तुम्ही घरी नसाल तर दुपारच्या वेळीही चोरटे घर साफ करू शकतात. त्यामुळे शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. शिवाय काही सुरक्षात्मक उपाययोजना देखील करण्याची गरज आहे.
- घराला कुलुप लावून जाण्यापूर्वी
घराच्या बाहेर कुठेही जात असाल तर घराला कुलुप लावून जाण्यापूर्वी काळजी घ्यावी. घरातील सर्व खिडक्या नीट लावून घ्याव्यात. कुलुप बरोबर लागले आहेत की नाही हे बघून घ्यावे. जाण्यापूर्वी शेजाऱ्याशी दोन शब्द बोलून त्यांना घराकडे थोडे लक्ष ठेवा, अशी विनंती करावी. तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात सुद्धा सूचना देऊन जावे.
- मौल्यवान वस्तू घरात न ठेवलेलेच बरे
सणासुदीच्या काळा मिळालेल्या भेटवस्तू किंवा पुजेसाठी वापरणारे आभूषण आपण घरातच ठेवतो. मात्र घराच्या बाहेर काही दिवसांसाठी जात असाल किंवा दिवसभर जरी घराला कुलुप राहत असेल तर या मौल्यवान वस्तूची सुरक्षा नीट राहिल याची काळजी घ्यावी. बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या लॉकरमध्ये सुद्धा या मौल्यवान वस्तू ठेवू शकता. विश्वासाच्या नातेवाईकाकडे अथवा मित्रांकडे सुद्धा वस्तू ठेवल्यास मोठा धोका होणार नाही.
- पोलीस वाढविणार गस्त
पोलीसांची गस्त नेहमीच असते. पण जर कुणी बाहेरगावी जात असल्यासंदर्भात पोलीसांना सूचना दिली. तर आम्ही त्या घराची विशेष काळजी घेतो. सणांच्या दिवसात कुठलीही विपरीत घटना घडणार नाही म्हणून पोलीसांची गस्त देखील वाढवितो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
- खरेदीसाठी किंवा बाहेरगावी घराला कुलुप लावून जात असाल तर मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका. बाहेरगावी जात असताना शेजाऱ्याला सांगून जा. नजिकच्या पोलीस स्टेशनला आम्ही बाहेर जात आहे, असे कळवा. दिवाळीत थोडी सावधगीरी बाळगा आणि उत्साहाचे हे पर्व आनंदाने साजरे करा.
चिन्मय पंडित, उपायुक्त, गुन्हे शाखा