लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते अपघात, जोखमीचे शारीरिक खेळ व आजारामुळे पाठीच्या कण्याला इजा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात बहुसंख्य जखमींवर उर्वरित आयुष्य खाटेवर किंवा व्हीलचेअरवर घालवावे लागते. याला गंभीरतेने घेत केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या पुढाकाराने नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ उभारण्याला मंजुरी देण्यात आली होती. परंतु निधीला घेऊन घोळ निर्माण झाल्याने हे ‘सेंटर’ रखडले होते. यामुळे मेडिकल प्रशासनाने पुन्हा या ‘सेंटर’च्या मंजुरीसह बांधकाम व मनुष्यबळाला प्रशासकीय परवानगीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यास ‘स्पाईनल इन्ज्युरी’च्या रुग्णांना विशेष सेवा देणारे हे मध्यभारतातील पहिले सेंटर असणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. या विभागांतर्गत इतर महत्त्वाच्या शस्त्रक्रियासोबतच पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया केली जाते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पाईनल सर्जरी करण्याची सोय नाही. यावर हे प्रस्तावित सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या सेंटरमध्ये पाठीच्या कण्यासह, मणक्याची बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया होतील. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी व लेझर या प्रगत-शास्त्रीय उपकरणांद्वारे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता रुग्ण वेदनामुक्त शस्त्रक्रिया येथे होतील. एक्स-रे (सी-आर्म) वर सुईचे टोकाद्वारे मणक्यावर शस्त्रक्रिया होतील.वर्षभरापासून प्रस्ताव रखडला‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ नागपूरच्या मेडिकलमध्ये होण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. यामुळेच केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाने २६ एप्रिल २०१७ रोजी राज्य शासनाला पत्र लिहून या प्रकल्पासंदर्भात विचारणा केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन देखील हे केंद्र उभारण्यासंदर्भात आग्रही होते. परंतु केंद्राकडून निधीला घेऊन घोळ झाल्याने हा प्रकल्प रखडला होता. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा व पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन्स रिसोर्सेसचे संचालक डॉ.विरल कामदार यांनी यात पुढाकार घेऊन पुन्हा नव्या स्वरुपातील प्रस्ताव तयार करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला.मेडिकलच्या ‘स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’चा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे. १५ हजार स्क्वेअर मीटरच्या जागेवर हे सेंटर प्रस्तावित असून साधारण ८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ‘सेंटर’ला मंजुरी मिळाल्यास मध्यभारतातील रुग्णांसाठी वरदान ठरेल.-डॉ. विरल कामदारसंचालक, दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन्स रिसोर्सेस