लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्ण गरीब असो वा श्रीमंत, त्यांना समान वैद्यकीय सेवा मिळायलाच हवी. मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत छोट्या इस्पितळांमध्ये ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) राहत नाही. यामुळे न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात रुग्णांना योग्य आणि प्रभावी उपचार मिळत नाही. म्हणूनच रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.‘न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया’च्या (एनएसआय) वर्ष २०१९ साठी अध्यक्षपदी डॉ. सिंह यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.विशेष म्हणजे, हे पद पहिल्यांदाच मध्यभारतातील न्यूरोसर्जनला मिळाले आहे. ‘एनएसआय’ कार्यकारणीची वार्षिक बैठक नुकतीच जयपूर येथे झाली. यावेळी डॉ. सिंह यांची निवड करण्यात आली. ‘एनएसआय न्यूरोसर्जन्स’, ‘न्यूरोलॉजिस्ट’, ‘न्यूरो अॅनेस्थेटिस’ व ‘न्यूरो पॅथालॉजिस्ट्स’आदी पालक संघटना आहेत. ही सोसायटी जगातील पाच प्रसिद्ध संघटनापैकी एक आहे.भविष्यातील योजना आणि प्राथमिकतेवर चर्चा करताना डॉ. सिंह म्हणाले, मेंदू रोगाशी संबंधित उपचारासाठी आयसीयू, व्हेंटिलेटर, अत्याधुनिक उपकरण आदींची गरज असते. परंतु ज्या चिकित्सकांकडे ही सोय नसेल त्यांनी जबरदस्तीने रुग्णांवर उपचार करू नये. रुग्णाचा जीव धोक्यात आणू नये. अशा प्रकरणाबाबत सोसायटीच्या मदतीने जनजागृती केली जाईल.
न्यूरोसर्जन्सला देणार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणडॉ. सिंग म्हणाले, सोसायटीच्या मदतीने युवा व नव्या न्यूरोसर्जन्सला प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी यात काही बदल करण्यात येतील. ‘शॉर्ट कोर्सेस’ चालविले जातील. ‘हँग्स आॅन वर्कशाप’ घेण्यात येतील. प्रशिक्षणाचा स्तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न राहणार आहे.
देशात केवळ तीन हजार न्यूरोसर्जन्सडॉ. सिंह म्हणाले, मेंदूची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची व जोखमीची असते. यामुळे विद्यार्थी हा विषय घेत नाही. देशात सध्याच्या स्थितीत २५०० ते ३००० चांगले न्यूरोसर्जन्स आहेत. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ही फार कमी संख्या आहे. जपानच्या एकट्या टोकियो शहरातच ५५०० ते ६००० न्यूरोसर्जन्स आहेत. यामुळे सर्जन्सची संख्या वाढायला हवी.