संबंधितांची नावे उघड न करण्याचा दबाव, ६० तास उलटूनही कोणावरच कारवाई नाही
नागपूर : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्यानंतरच कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, सुरक्षा रक्षक जागे झाले. हे स्पष्ट दिसून येत असतानाही कोणावरच अद्याप कारवाई झाली नाही. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या दिवशी ‘एसएनसीयू’मध्ये कर्तव्यावर असलेल्यांची नावेही सांगण्यास अधिकारी तयार नाहीत. हे विदर्भातील एका बड्या नेत्याचा दबावामुळे होत असल्याचा आणि आता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयातील ‘एसएनसीयू’ हा ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये विभागला आहे. ‘इन बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयात प्रसूती झालेल्या कमी वजनाची व इतरही आजारांची बालके ठेवली जातात, तर ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयाबाहेर प्रसूती झालेली बालके ठेवली जातात. या दोन्ही युनिटमध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षा रक्षक असावे लागतात. कक्षात सोय नसेल, तर बाजूच्या काचेच्या कक्षातून नजर ठेवावी लागते.
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. दोन परिचारिका व एक अटेंडंट होता. परिचारिका रात्री १० च्या सुमारास ‘एसएनसीयू’ला बाहेरून बंद करून झोपण्यासाठी बाजूच्या कक्षात निघून गेली. ‘आऊट बॉर्न युनिट’ला आगीला सुरुवात होण्यापासून ते तीन बालकांचा जळून, तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू होईपर्यंत कोणाचेच लक्ष गेले नाही. जेव्हा धूर ‘एसएनसीयू’मधून बाहेर येऊ लागला तेव्हा कुठे प्रशासन जागे झाले. यावरून कर्तव्यावर असलेल्यांचा कसूर स्पष्ट दिसून येतो. भंडारा अग्निकांड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार, कुणालाच मुलाहिजा ठेवणार नसल्याचे शासन म्हणत असले तरी घटना होऊन ६० तास उलटून गेले आहेत. मागील दोन दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत. परंतु, दोषींना अद्यापही सामोर केलेले नाही. यासाठी एक नेता आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचेही बोलले जात आहे.