लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रद्द झालेल्या ई-तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड मागितल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी टीटीईला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्थी करून टीटीईचा बचाव केल्यामुळे अनर्थ टळला.जितेंद्र जयंतराव दरभे (४०) रा. वॉकर रोड, महाल असे फिर्यादीचे टीटीईचे नाव आहे. ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीटीई म्हणून कार्यरत आहेत. ०७००९ सिकंदराबाद-बरौनी रक्सोल एक्स्प्रेसमध्ये नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप दिनकर, संजय बोस, चंद्रशेखर वैद्य अणि टीटीई जितेंद्र दरभे असे चौघे ड्युटीवर होते. समोरच्या जनरल कोचमध्ये सीआयएसएफचे जवान, मागील जनरल कोचमध्ये आरपीएसएफ जवान होते. टीटीई तपासणी करीत स्लीपर कोचमध्ये गेले. त्यांनी प्रवाशांना तिकीट विचारले. सहा प्रवाशांनी त्यांना ई-तिकीट दाखविले. मात्र, हे तिकीट रद्द झालेले होते. त्यामुळे मुख्य तिकीट निरीक्षकांनी दंड मागितला. जवळपास सात हजार रुपये दंड होत असल्याचे टीटीईने सांगितले. यावरून प्रवासी संतापले आणि गाडी भूगाव जवळ असताना नकली टीसी दंड मागत असल्याची अफवा पसरविली. प्रवासी चिडल्यामुळे चारही टीटीई जीव मुठीत घेऊन सीआयएसएफ जवानाच्या कोचमध्ये पळाले. सेवाग्रामला गाडी थांबली असता प्रवाशांनी त्या कोचचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. नागपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १ वाजता ही गाडी प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. यावेळी दिनकर, बोस आणि वैद्य हे तिघेही उतरून निघून गेले. प्रवाशांना जितेंद्र दरभे हे दिसताच त्यांना घेराव घालून मारहाण केली. यावेळी दरभे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, पर्स आणि मोबाईलही गहाळ झाला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान मदतीला धावून आले. शेषराव पाटील या जवानाने मध्यस्थी करून दरभे यांना गर्दीतून बाहेर काढल्यामुळे टीटीईचा जीव वाचला. काही वेळात गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली. दरम्यान, चारही टीटीर्इंनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.टीटीर्इंची सुरक्षा धोक्यातया घटनेमुळे रेल्वे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यावर अधिकार काय निर्णय घेतात, यावर टीटीई संघटनेकडून पुढचे धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दंड मागितल्यामुळे टीटीईला सिकंदराबाद-बरौनी एक्स्प्रेसमध्ये मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:46 PM
रद्द झालेल्या ई-तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड मागितल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी टीटीईला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्थी करून टीटीईचा बचाव केल्यामुळे अनर्थ टळला.
ठळक मुद्देआरपीएफच्या मध्यस्थीमुळे जीव वाचला