लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेना संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना दाेन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून खाेकला, ताप व वजन कमी हाेण्याची लक्षणे दिसून येत आहेत, त्यांची क्षयराेग (टीबी)तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संक्रमितांचा एक्स-रे काढण्यात येईल आणि सीबी नेट टेस्ट केली जाणार आहे. महापालिकेचे आराेग्य अधिकारी डाॅ. नरेंद्र बहिरवार व शहर क्षयराेग अधिकारी डाॅ. शिल्पा जिचकार यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या आराेग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार टीबी रुग्णांची काेविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच धर्तीवर ज्यांना अधिक काळासाठी संक्रमणाची लक्षणे दिसून येतील त्यांची क्षयराेगाची तपासणी केली जाईल. नागपूर मनपा अंतर्गत सारीच्या २२१ रुग्णांपैकी ११ रुग्णांना टीबी असल्याचे दिसून आले आहे. मेयाे, मेडिकल व सदर राेग निदान केंद्रातील काेविड रुग्णांच्या अभ्यासानंतर ०.३७ ते ४.४७ टक्के रुग्णांमध्ये क्षयराेगाचे प्रमाण आढळून आले आहे. टीबीच्या रुग्णांना २.१ टक्के अधिक धाेका हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्षयराेग व काेविडचे निराकरण हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे मेडिकल, मेयो तसेच सदर राेगनिदान केंद्र व संशाेधन संस्थेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात क्षयराेगाची तपासणी केली जात असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.