नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ १७ जुलैला संपत आहे. मात्र अद्याप आरक्षण सोडत न काढल्याने अध्यक्षांची निवड प्रक्रिया रखडली आहे. मात्र १६ जुलैला विशेष सभेत उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
विद्यमान उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळालेला नसल्याने त्यांचीच या पदावर फेरनिवड होण्याची जिल्हा परिषदेमध्ये चर्चा आहे. मात्र त्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे उपाध्यपदासाठी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ सदस्य इच्छुक असल्याने त्यांनी मार्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापतींची निवड करताना माजी मंत्री सुनील केदार कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक घेतली. यात त्यांच्या सर्कलमधील विकासकामांचा आढावा घेतला. परंतु उपाध्यक्षांच्या नावासंदर्भात चर्चा झाली नसल्याची माहिती सदस्यांनी दिली.
अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सभापतींची निवड केली जाणार असल्याने सभापतींची निवड जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
१३ जुलैला अध्यक्षपदाची सोडत?
जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ १७ जुलैला संपत आहे. मात्र अद्याप आरक्षण सोडत काढण्यात आलेली नाही. १३ जुलैला सोडत काढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र १३ जुलैला सोडत काढली तरी १७ जुलैपूर्वी अध्यक्षांची निवडणूक घेणे शक्य होणार नाही. निवडणुकीसाठी किमान १० दिवसांपूर्वी नोटीस काढणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस -३२
भाजप- १४
राष्ट्रवादी- ८
शिवसेना- १
गगोपा- १
शेकाप- १
अपक्ष- १