लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी नागपूर सोडताना नागपूरकरांनी जो उत्स्फूर्त भावूक निरोप दिला त्याने ते भारावून गेले आहेत. मुंबईत गेल्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारी सोशल मिडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून देणारी एक पोस्ट टाकली आहे.अशी आहे तुकाराम मुंढे यांची पोस्टकाल नागपूरकरांचा निरोप घेताना मन सुन्न झालं होतं. लोकांनी माझ्यातला कठोर अधिकारी अनुभवला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यातला भावुक अधिकारी नागपूरकरांनी अनुभवल्याचं विश्लेषण माध्यमांनी केलं. आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो. नागपुरातून निघताना हृदय जड झालं होतं.त्याला कारणही तसंच होतं. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मला थांबविण्यासाठी नागरिक चक्क बंगल्याच्या दारावर चार-चार तास ठिय्या देतात, यातच सारे सामावले आहे. नागरिकांच्या भावनांचा मी आदर करतो. मात्र, मी केवळ एक निमित्त होतो. मी अधिकारी असल्याने माझी बदली ही ठरलेलीच आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य, जबाबदारी ओळखायला हवी. आपण दाखविलेले प्रेम अपूर्व आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. या प्रेमाची आणि आपण दाखविलेल्या विश्वासाची उतराई करणे मला तरी शक्य नाही. मी सदैव आपल्या प्रेमाच्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा एकदा आपले मन:पूर्वक धन्यवाद...!
Completely Humbled...
Thank you.....Is not ENOUGH!!