लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्प्ािंग यार्डचा अचानक पाहणी केली. ओला आणि सुक्या कचऱ्याचा एकत्र ढिग पाहून ते संतापले. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून दिला पाहिजे. परंतु अजूनही येथे एकत्रित कचरा येत आहे. त्यात प्लास्टीकचाही समावेश असल्याने त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे ओला व सुका कचरा वेगळा संकलीत न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंढे यांच्या अचानक दौऱ्यामुळे मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच मुंढे यांनी स्वच्छतेचा मुद्दा हाती घेतला. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. अशी तंबी आरोग्य विभागाचे अधिकारी व कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना दिली. जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा देत असतील त्याचीच उचल करा, याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यावर मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी,आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापन, बायोमायनिंग प्रक्रीया, कंपोस्टिंग प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर मुंढे यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची पाहणी केली. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संक लीत करून दिला असता तर आज भांडेवाडी येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली नसती. कंपन्यांना विलग केलेला कचराच उचलण्याचे निर्देश दिले. भांडेवाडी येथील कचऱ्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सुमारे एक लाख नागरिक अस्थमामुळे त्रस्त आहेत. याचा विचार करता कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याला प्राधान्य असल्याचे मुंढे यांनी सांगितले. लोकसहभाग व महापालिकेचे प्रयत्न यातून ही समस्या मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदभार स्विकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढे यांनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. तसेच कामात अनियमतता आढळल्याने लेखा व वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावली. तसेच सिमेंंट रस्त्यांचे काम निकृष्ट आढळल्याने कंत्राटदार व उपअभियंत्याला नोटीस बजावण्यात आली. यामुळे अधिकारी व कर्मचारी शिस्तीत आले आहेत.
...तर नागरिकांवरही कारवाईडम्पिंग यार्डवर कचरा डम्प करताना ओला व सुका वेगळा टाकणे आवश्यक आहे. नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करावा. अधिकारी आणि कर्मचाºयांनी यासाठी आग्रह धरावा. त्यानंतरही नागरिक कचरा वेगेवगळा ठेवत नसतील तर त्यांच्यावरीही कारवाई केली जाईल. असा इशारा मुंढे यांनी दिला.