राजीव सिंह/गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ज्या प्रकारे नागपूर शहरात कोविड-१९ च्या रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे त्यानुसार शहरातील नागरिकांना सवलत मिळण्याची शक्यता दिसत आहे. ३१ मे नंतर लॉकडाऊन उठणार की नाही यावर केंद्र व राज्य सरकार निर्णय येईल. परंतु सवलत देण्याचे पूर्ण अधिकार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आहेत. नागपुरातील रिकव्हर रेट ८० टक्केच्या जवळपास आहे. परंतु मुंबई, पुणे येथून परतणाऱ्या संक्रमितामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे. ३१ मे नंतर शहरातील नागरिकांना सवलत मिळणार? संक्रमण रोखण्यासाठी मनपा कोणत्या उपाययोजना करीत आहेत? क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या व्यथा, आदी विषयावर 'लोकमत' ने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, सरकारकडून येणाºया दिशानिर्देशांच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. याशिवाय संक्रमण रोखण्यासाठी नागरिक नियमांचे कितपत पालन करतात व कोविड-१९ ची संक्रमणावस्था यावर नागरिकांना सवलत द्यायची की नाही हे निर्भर राहील. नागपूर शहराला कोविड -१९ च्या संक्रमणातून मुक्त करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला.प्रश्न - नागपुरातील संक्रमण रोखण्यासाठी आपण कोणता मार्ग स्वीकारला, कोणत्या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले?उत्तर- नागपूर शहरात पहिला कोविड रुग्ण११ मार्चला आढळून आला. त्यानंतर लगेच मनपा प्रशासनाने सरकारतर्फे जारी दिशानिर्देशाचे पालन केले. सोबतच स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला. सध्या नागपूर शहरात ४५० संक्रमित आहेत. यातील ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओळख ,अलगीकरण व उपचार या त्रिसूत्रीवर मनपाने काम केले. ४ हजाराहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. याचा फायदा मिळाला. डेथ रेट नियंत्रणात ठेवण्यात यश आले.प्रश्न- लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत मिळाल्याने संक्रमणाचे प्रमाण वाढले. यावर नियंत्रण करण्यासाठी काय व्यवस्था आहे?उत्तर - हॉटस्पॉट सक्तीने लागू केल्याने संक्रमणावर नियंत्रण आणले. परंतु बाहेरून येणाºया काही प्रवाशांमुळे सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याचा विचार करता विमान, रेल्वेने नागपूरला येणाºया लोकांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश दिले आहेत. जो त्याचे उल्लंघन करेल त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येईल. खासगी रुग्णालयांनासुद्धा निर्देश दिले असून ज्या रुग्णात कोरोनाची लक्षणे दिसत आहे. याची माहिती द्या, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसर सील केला जात आहे.प्रश्न- क्वारंटाईन सेंटर येथील व्यवस्था,जेवण निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.उत्तर: कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे ते कळत नाही. ज्या केंद्रावरून तक्रारी मिळत आहे त्याचे निराकरण केले जात आहे. जेवणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. दोन दिवसापूर्वी राधास्वामी सत्संग मंडळ यांच्यातर्फे जेवण पुरवठा होत आहे. येथे स्वच्छता व गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या स्वरूपाचे अन्न मिळत नाही. सध्या १७०० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. केंद्रातील स्वच्छता, येथील शौचालय, बाथरूम याकडे विशेष लक्ष दिले जाते. जेवणाच्या दर्जाकडे विशेष लक्ष पुरविले जाते.आलेल्या तक्रारींचा तात्काळ निपटारा केला जात आहे नागपूर शहराला ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी सर्वांनी मदत करण्याची गरज आहे.प्रश्न - प्रतिबंधित क्षेत्रात असंतोष वाढत असल्याबाबत आपण काही सांगू इच्छिता?उत्तर - ज्या भागात कोविड-१९ चा रुग्ण आढळून येतो असा परिसर पाच किलोमीटर परिक्षेत्रात सील करण्याचे दिशानिर्देश आहेत. याची माहिती घेऊन परिसर सील केला जातो. प्रतिबंधित क्षेत्रात विरोध करण्याचे काही कारण नाही २८ दिवसापर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात रुग्ण न आढळल्यास तेथील प्रतिबंध हटविले जातात. आजवर ११ क्षेत्रातील प्रतिबंध हटविण्यात आले आहे. नियमाचे पालन करावे लागते. विरोध झाला म्हणून प्रतिबंध हटविणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात मनपातर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याकडे लक्ष दिले जात आहे.प्रश्न - ३१ मे नंतर नागपुरात सवलत मिळेल का?उत्तर- सध्याच या विषयी काही बोलणे योग्य होणार नाही. सरकारतर्फे जे दिशानिर्देश येतील त्याचे पालन केले जाईल. किती सवलत मिळणार हे शहरातील नागरिकांच्या हातात आहे. जर त्यांनी नियमांचे पालन केले. संक्रमण कमी झाले तर सवलत निश्चित मिळेल, आणि जर दोन्ही झाले नाही तर सवलत देताना अडचणी येतील.प्रश्न- विकास कामांना ब्रेक लावल्याचा आरोप होत आहे.उत्तर- महापालिका आयुक्तपदाची तीन महिन्यापूर्वी जबाबदारी स्वीकारली. जी आवश्यक कामे आहेत त्यांचा अर्थसंकल्पात समावेश केला आहे. कोणतेही नवीन काम सुरू केलेले नाही. कारण मनपाकडे पैसे नाही नियमित खर्च व देखभालीसाठी दर महिन्याला ८० कोटींची गरज आहे. परंतु इतकी रक्कम जमा होत नाही. सध्या मनपाची आर्थिक स्थिती बिकट होत आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास काही कामे बंद होतील. त्यामुळे विकासाला ब्रेक लावला असे म्हणणे योग्य होणार नाही. सिमेंट रोडचे काम गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे. ते तीन -चार वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते.