लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवपत्नी असो वा मानवपत्नी... आत्मा स्त्रीचाच आणि दोघींच्याही संवेदनेला पराकोटीचा संघर्ष. त्यातून उत्पन्न झालेले दु:ख, हेच स्त्रीसूक्त! ‘संगीत देवबाभळी’ त्याच स्त्रीसूक्ताचे बीज अंकुरित करते आणि स्त्री मनाच्या वेदनेचे पाझर मोकळे करते.दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या २८ व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या तिसऱ्या दिवशी कविता मच्छिंद्र कांबळी निर्मिती श्री भद्रकाली प्रॉडक्शतर्फे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सादर झाले. संत तुकारामांच्या व्यक्तित्त्वाची आभा आणि त्यांच्या अभंगाचा गर्भित सार, याच्याभोवती गुंफण्यात आलेले हे नाटक स्त्री मनाचा तरल वेध घेते. मग, ती स्त्री देवकाळातील असो, प्राचीन, ऐतिहासिक किंवा आधुनिक काळातील... परिवर्तन भौतिक झाले, मनाचे नाही, हे या नाटकातून प्रतीत होते आणि विशेष म्हणजे, आधुनिक स्त्री त्यात स्वत:चा संदर्भ शोधू शकते..तुकारामाची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी रखुमाई, या दोघींचा संवाद आणि त्यातून फुलवत गेलेले नाट्य.. कधी हसवते, कधी टोचते तर कधी अंतर्मुख होण्यास बाध्य करते. तुकारामाच्या विठूवेडामुळे त्रस्त असलेली आवली आणि विठ्ठलाशी अबोला धरलेली रुक्मिणी, या दोघींच्या विभिन्न पातळ्यांवरील दु:खाची लकेर, नाटक बघताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटायला लागते आणि प्रेक्षकांचीही त्यात हळूच सरमिसळ होऊन, संवादाच्या प्रक्रियेला सुरुवात होते, हेच या नाटकाचे वैशिष्ट्य. मानसी जोशीने साकारलेली रखुमाई आणि शुभांगी सदावर्ते हीने साकारलेली आवली, अंतर्मनात दडून बसलेल्या मन आणि बुद्धीला वाचा फोडणारे प्रतिकात्मक पात्र उत्तम रंगवले. पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्याचा उत्कृष्ट असा पेहाराव नाटकाला लाभल्याने, नाटकही मनाचा ठाव घेते. नाटकाचे दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांचेच होते. तर, संगीत आनंद ओक, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, पृष्ठभूमी व दृश्य संकल्पना प्रदीप मुळ्ये, पार्श्वगायन पं. आनंद भाटे, वेशभूषा महेश शेरला, रंगभूषा सचिन वारीक यांची होती. या नाटकाचा हा शहरातील तिसरा प्रयोग होता. या नाटकाने आजवर ३९ पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.रंजन दारव्हेकर व प्रदीप पंच यांचा सत्कारयावेळी नागपुरातील ज्येष्ठ नाटककार डॉ. रंजन पुरुषोत्तम दारव्हेकर व ज्येष्ठ गिटारिट्स प्रदीप पंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दमक्षे केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, कार्यक्रम अधिकारी शशांक दंडे, कुणाल गडेकर, मोहन पारखी उपस्थित होते.डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी ‘संगीत देवबाभळी’ हे मराठी नाटक सादर झाले. तुकारामांचे अभंग आणि नाटकातील संवादांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
तुकारामाचे अभंग अन् भावगर्भित तरल संवादाने नाट्यरसिक गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:01 AM
देवपत्नी असो वा मानवपत्नी... आत्मा स्त्रीचाच आणि दोघींच्याही संवेदनेला पराकोटीचा संघर्ष. त्यातून उत्पन्न झालेले दु:ख, हेच स्त्रीसूक्त! ‘संगीत देवबाभळी’ त्याच स्त्रीसूक्ताचे बीज अंकुरित करते आणि स्त्री मनाच्या वेदनेचे पाझर मोकळे करते.
ठळक मुद्देदेवभाबळी : वाटावया दु:खे आवलीची, रखुमाई आली तुकोबा दारी!डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह