लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीच्या ‘डायमंड फॉरेव्हर’ या संगीत उपक्रमात रविवारी मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांना स्वरांजली वाहण्यात आली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना श्री सिद्धीविनायकचे समीर पंडित यांची होती. सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित आणि श्रेया खराबे या आघाडीच्या गायकांनी ही स्वरांची मैफिल सजविली. सोनाली यांनी ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे सारंग यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., ये नयन डरे डरे...’, पाटील यांच्या ‘तारो मे सजके..., एक दिन बिक जायेगा माटी के मोल...’, सागर यांनी ‘चला जाता हुं..., ओ मेरे दिल के चैन..., ठंडी हवा ये चांदनी सुहानी...’ तर श्रेया यांचे ‘बाहो मे चले आ...’ अशा सुरुवातीच्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुढे ‘ये दिल सुन रहा है..., माना हो तुम..., रुक जाना नही..., मेरी भीगी भीगी सी..., दिल पुकारे..., मेरा प्यार भी तू है..., ओ बेकरार दिल..., चलते चलते युंही कोई..., गुम है किसी के प्यार मे..., लुटे कोई मन का नगर..., वो तो है अलबेला..., रात अकेली है..., तुम जो मिल गये हो...’ अशा विविधांगी गीतांनी कार्यक्रम बहरत गेला.सुरेल साथसंगत करताना किबोर्डवर राजा राठोड, रुग्वेद पांडे (गिटार), अमर शेंडे (व्हायोलिन), प्रशांत नागमोते (तबला), विक्रम जोशी (तुंबा) व ऑक्टोपॅडवर राजू ठाकूर यांनी समा बांधला.