लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना रेशन दुकानातून स्वस्तदरात तूर डाळ देण्यात येते. परंतु अनेकवेळा तूर डाळ उपलब्धच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक रेशन दुकानामधून तूर डाळ गायब झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात चणा डाळ देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला.मागील दोन-तीन वर्षात राज्यात तूर डाळीचे चांगले उत्पादन झाले. त्यामुळे राज्य शासनाने रेशन दुकानांमधून नागरिकांना तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय घेतला. शहरात एकूण ६६५ रेशन दुकाने आहेत. ३ लाखावर कार्डधारक आहेत. ५५ रुपये किलोप्रमाणे रेशन दुकानात केशरी व बीपीएल कार्डधारकांना एक किलो तूर डाळ वितरित केली जाते. शहरात महिन्याला ६६७ मेट्रिक टन तूर डाळीची गरज आहे. जानेवारी, फे ब्रुवारी महिन्यात नागरिकांनी रेशन उचलले तेव्हा त्यांना गहू व तांदूळ मिळाले. परंतु तूर डाळ मिळाली नाही. याबाबत नागरिकांनी दुकानदारास विचारणा केली असता शासनाकडून पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात आले. काही रेशन दुकानांमध्ये तूर डाळीऐवजी चणा डाळ वितरित केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. काही नागरिकांचे म्हणणे होते की, दोन महिन्यापासून तूर डाळ मिळालेली नाही. रेशन दुकानदारांनीही याला दुजोरा देत शासनाकडून तूर डाळ मिळाली नसल्याचे सांगितले. रेशन दुकानात तूर डाळ बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभरात अनेकदा हा प्रकार होत असतो. सहा ते सात महिनेच तूर डाळ उपलब्ध होते, ही वस्तुस्थिती आहे. खुल्या बाजारात तूर डाळ आजही १०० रुपये किलो च्या घरात मिळते. त्यामुळे रेशन दुकानातून तूर डाळ खरेदी करण्यासाठी अनेकजण वाट पाहत असतात. परंतु ती उपलब्ध होत नसल्याने गरीब नागरिकांना बाहेरून डाळ खरेदी करावी लागत आहे.उशिरा डाळ मिळाल्याने अडचणगहू आणि तांदळाचा स्टॉक लवकर मिळतो. तूर डाळीचा स्टॉक नंतर येतो. एखाद महिन्यात शासनाकडून तूर डाळ उशिरा मिळाल्याने गॅप पडते. असाच काहिसा प्रकार झाला असवा, परंतु सध्या डाळ मिळालेली आहे. ती वितरित केली जाईल.भास्कर तायडेजिल्हा पुरवठा अधिकारी
नागपुरात रेशन दुकानातून तूरडाळ पुन्हा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 8:48 PM