आठ केंद्रात विक्री सुरू : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते योजनेची सुरुवातनागपूर : ग्राहकांना १३० रुपये प्रति किलो दराने तूर डाळ व ६२ रुपये प्रति किलो दराने चना डाळ देण्याच्या योजनेची सुरुवात शनिवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सीताबर्डी येथील अपना भंडार फेअर प्राईस सुपर मार्केट येथे तूर डाळ विक्री करून झाली. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी रमेश बेंडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, अपना भंडारचे संचालक एच.जी. जसवानी, व्यवस्थापक ठाकरे, तसेच विदर्भ दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गोयल उपस्थित होते. नागपुरात अपना भंडारच्या आठ केंद्रावरून या डाळींची विक्री शनिवारपासून सुरू झाली आहे. सीताबर्डी येथील सुपर मार्केट, सोमलवाडा येथील सावित्री विहार, जयप्रकाशनगर येथील प्लॉट नंबर २, पंचदीप गृहनिर्माण संस्था, त्रिमूर्तीनगर चौक, अंबाझरी हिरालक्ष्मी प्लॉट नंबर-५३, शास्त्री ले-आऊट सुभाषनगर, हिंगणा रोड, बरडे कॉम्प्लेक्स फ्रेण्ड्स कॉलनी काटोल रोड, दत्तात्रयनगर प्लॉट नं. -४० साई अपार्टमेंट महाकाळकर सभागृहाजवळ सक्करदरा, बुटीबोरी औद्योगिक परिसर, वैैभव हाईट्स प्लॉट नंबर -एस-२९३ कमर्शियल झोन, एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट बुटीबोरी येथे तूर डाळ व चणा डाळ निर्धारित दरात मिळेल. नागपूर दाल मिल असोसिएशन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे. या सर्व विक्री केंद्रांवर अन्न पुरवठा विभागाचे लक्ष राहणार आहे. यासाठी एक विशेष चमू तयार करण्यात आली आहे. ग्राहकांना माफक दरात डाळ मिळावी, यासाठी समन्वयाने हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
१३० रुपये किलो दराने तूर डाळ
By admin | Published: November 01, 2015 3:21 AM