समीर मेघे यांनी वेधले लक्ष : प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याच्या मंत्र्यांनी दिल्या संबंधितांना सूचनाहिंगणा : तुरागोंदी प्रकल्प सिंचनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात यावे, याकडे आ. समीर मेघे यांनी आढावा सभेत जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर तत्काळ सर्व प्रशासकीय कामे पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याबाबतच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधितांना केल्या. त्यामुळे तुरागोंदी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन प्रकल्पांबाबत आढावा सभा नुकतीच पार पडली. सदर सभेत आ. समीर मेघे यांनी हिंगणा क्षेत्रातील तुरागोंदी सिंचन प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षांपासून रखडले असल्याची बाब जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच हिंगणा मतदार संघातील मांडवघोराड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचन प्रकल्पाच्या कामाकरिता घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यांचा वापर होत नसल्याने त्या जमिनी शेतकरी परत मागत असल्याची बाब आ. मेघे यांनी उपस्थित केली असता, या संदर्भात अभ्यास करून प्रकरण चर्चेसाठी ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागास देण्यात आल्या. आजनगाव, खडकी, सुराबर्डी, मोहगाव झिप्ली या लघु प्रकल्पातील व वेणा आणि कान्होलीबारा या मध्यम प्रकल्पातील सफाई कामे केली जावी, जेणेकरून पाण्याचा साठा वाढेल तसेच लखमापूर प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील रामा डॅम प्रकल्पास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याने त्या भागातील रस्ते विकासाची कामे सिंचन विभागाकडून पूर्ण करण्याबाबतचे निवेदन आ. समीर मेघे यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिले. या सर्व प्रश्नांवर विचार होऊन सर्व प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आ. मेघे यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
तुरागोंदी प्रकल्प मार्गी लागणार
By admin | Published: May 06, 2016 3:13 AM