- वनविभाग व आरपीएफचीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या पार्सलसेवेद्वारे कासव तस्करी होत असल्याचा भंडाफोड रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने मंगळवारी केला. यात आरोपीस अटक करण्यात आले असून, कासव वनविभागाच्या हवाली करण्यात आले.
रेल्वेच्या पार्सल विभागाकडे रंगीत मासोळ्यांची नोंद करून प्लास्टिकच्या दोन बंद पिशवीत पाळीव कासव नागपूरपर्यंत पोहोचवण्यात आले. चेन्नई ते नागपूर असा हा प्रवास होता. हे पार्सल नागपूर रेल्वेस्थानावर उतरविल्यानंतर पार्सल कार्यालयात ठेवण्यात आले. दरम्यान पार्सल पर्यवेक्षक अतुल श्रीवास्तव यांना शंका आली. त्याच वेळी ते पार्सल घेण्यास आरोपी यशवंतदाव लियरलावाल (२८, रा. चंद्रपूर) पार्सल कार्यालयात आला. त्याच्याच उपस्थितीत पार्सल उघडण्यात आल्यावर प्लास्टिकच्या दोन बंद पिशवित छोटी छोटी जिवंत कासव आढळून आली. घटनेची माहिती आरपीएफ निरीक्षक मीणा यांना देण्यात आली. पथकाने पार्सल नोंदणीची तपासणी केली असता, रंगीत मासोळ्यांची नोंद आढळून आली. रंगीत मासोळ्यांच्या नावाखाली पाळीव कासव नागपुरात आणण्यात आल्याची माहिती मीणा यांनी वनविभागाला दिली. वन विभागातील अधिकारी डॉ. सैयद दिलाल यांनी पार्सल कार्यालयात पोहोचून कारवाई केली. त्यानंतर आरपीएफने सर्व कासव वनविभागाच्या हवाली केले. आरपीएफने आरोपीविरूद्ध रेल्वे नियमांतर्गत गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास उपनिरिक्षक सचिन दलाल करत आहेत. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
.........