नागपूर : दहावीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण होता येणार आहे. त्यासाठी बोर्डाने आयटीआयला बारावीची समकक्षता प्रदान केली आहे. यासंदर्भातील कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रस्तावाला शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकप्रकारे बारावीचा बोनस मिळणार आहे.
दहावीनंतर विद्यार्थी आयटीआयमध्ये दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करतात. आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे अपेक्षित हित साध्य न झाल्यास, अथवा पुढे शिकण्याची इच्छा असल्यास पुन्हा अकरावी व बारावी करतात. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्णदेखील होता येईल. त्यासाठी आयटीआयचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल. बोर्डाकडून त्या विद्यार्थ्यांना ४ विषयाचे क्रेडिट्स देण्यात येईल. भाषेच्या दोन विषयाचे पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागतील. भाषेच्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला बारावी उत्तीर्णची गुणपत्रिका मिळेल. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांसमोर पुढच्या शिक्षणाचे पर्याय उपलब्ध राहतील.
- दहावी अनुत्तीर्ण होऊ शकतो उत्तीर्ण
जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी आयटीआयमध्ये दहावी अनुत्तीर्णच्या बेसवर आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स देण्यात येतील. त्यांनीही भाषेच्या दोन विषयाचे पेपर उत्तीर्ण केल्यानंतर दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका मिळणार आहे.
- कौशल्य व उद्योजकता विभागाच्या या प्रस्तावाला शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. राज्यातील सर्व आयटीआयने राज्य मंडळाकडून माध्यमिक शाळांप्रमाणे मंडळ सांकेतांक घेतले आहे. यंदाचे हे पहिले वर्ष आहे. हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे.
हेमंत आवारे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर