नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. २३ एप्रिलपासून बारावीच्या परीक्षा होणार होत्या. पण कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्याने त्याही पुढे ढकलाव्या लागल्या. सद्या बारावीच्या परीक्षेवरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा होईल की नाही, यावर राज्य सरकार अथवा बोर्डाकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नाही. १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊननंतरच निर्णय स्पष्ट होऊ शकतो.
यासंदर्भात नागपूर बोर्डाच्या सचिव माधुरी सावरकर यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की परीक्षेच्या बाबतीत बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने, ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच सरकार परीक्षेबाबत घोषणा करू शकते. परंतु सद्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून कुठलेही निर्देश आलेले नाही. जानेवारी २०२१ नंतर राज्यात कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे बोर्डाने मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षा २३ एप्रिलला घेण्याचे नियोजन आखले होते. त्या अनुषंगाने बोर्डाकडून लेखी परीक्षेचे साहित्य केंद्र संचालकांपर्यंत पोहचविण्यात आले होेते. बोर्डाकडून परीक्षेचा निर्णय होईपर्यंत केंद्रामधील कपाटात सिलबंद ठेवले आहे. राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे १५ मे नंतरच परीक्षेबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
- बोर्डाचे वेट अॅण्ड वॉच
बोर्डाने परीक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता परीक्षेचे आयोजन अवघड आहे. लेखी परीक्षेशिवाय बोर्डाजवळ दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बोर्डाने सद्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
- विद्यार्थी व पालक चिंतेत
बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेली अनिश्चितेतमुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. परीक्षेच्या तारखा वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडाले आहे. सध्या राज्यात कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता, परिस्थिती सामान्य होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे लक्ष सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.
- बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बारावीनंतर विद्यार्थी भविष्याचा दिशा ठरवित असतो. त्यामुळे परीक्षा घ्याव्याच लागणार आहे. लेखी परीक्षेशिवाय दुसरा पर्याय बोर्डाकडे नाही आणि ते शक्यही नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा घ्याव्याच लागतील.
डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य