लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाइलचे वेड जडलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. भावेश नरेंद्र चितमलकर असे त्याचे नाव आहे. १७ वर्षीय भावेश बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील शिक्षक असून बहीण वैद्यकीय क्षेत्रात काम करते. सक्करदरा येथील दत्तात्रेयनगरात चितमलकर कुटुंबीय राहते. भावेशला त्याच्या आईवडिलांनी क्रॅश कोर्ससाठी औरंगाबादला पाठवले होते. लॉकडाऊनमुळे तो औरंगाबादहून नागपुरात परतला. घरी आल्यानंतर तो सारखा मोबाइलमध्ये गुंतून राहायचा. आईवडील त्याला याबाबत विचारणा करीत होते. मात्र, तो वेळ मारून न्यायचा. गुरुवारी रात्री भावेशचे आईवडील त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते. रात्री ९ च्या सुमारास बहीण घरी परतली. तेव्हा भावेश त्याच्या शयनकक्षात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आपल्या आई-वडिलांना माहिती देऊन घरी बोलवून घेतले. त्यानंतर भावेशला डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या रूमची आणि बॅगची तपासणी केली. मात्र सुसाइड नोट अथवा असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे तूर्त गुलदस्त्यात आहे.
ठाणेदार सत्यवान माने यांनी भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडूनही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने मोबाइल गेमच्या नादातून आत्महत्या केली का, असा प्रश्न केला असता पोलिसांनी त्याबाबत ठोस उत्तर देता येणार नाही, असे म्हटले.