भिवापूर : पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छतेतून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता अधिक असताना, भिवापूर शहरात मात्र स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. नगरपंचायतीने लावलेल्या कचराकुंड्या तुडुंब भरल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, कचराकुंडी किंवा खाली पडलेला कचरा स्वच्छ करण्याचे कौशल्य नगरपंचायतीकडून अद्यापही दाखविले गेलेले नाही.
स्थानिक धर्मापूर पेठेतील इंदिरा गांधी चौकात स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. नगरपंचायतीकडून शहरात कचरा टाकण्यासाठी महागड्या कचराकुंड्या लावण्यात आल्यात. नागरिकांनीही स्वच्छतेला साथ देत, कचरा उघड्यावर न फेकता, कचराकुंडीमध्ये टाकण्यास सुरुवात केली. मात्र, कचराकुंडी कचऱ्याने तुडुंब भरल्यानंतर, ती स्वच्छ करण्याचे कौशल्य नगरपंचायतीकडून दाखविले जात नाही. परिणामी, नागरिकांनी आता कचराकुंडीच्या परिसरात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार केवळ धर्मापूर पेठेत नसून, शहरातील इतरही प्रभागात होताना दिसत आहे. कचरा संकलनाचे कार्य नियमित होत नसल्याने, जनावरे या कचराकुंड्यांना तोंड लावतात. त्यामुळे त्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराच्या कामावर नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्वच्छतेचा देखावा करत, शासनाच्या तिजोरीतून निव्वळ पैसे उकळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप आता होत आहे.
शहरातील अस्वच्छता सोशल मीडियावर?
धर्मापूर पेठेतील अस्वच्छतेबाबत येथील नागरिक दररोज ओरडत आहे. त्यांनी तोंडी तक्रारीही केल्यात. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. अखेरीस येथील नागरिकांनी अस्वच्छता व घाणीचे फोटो काढून सोशल मीडियावर वाचा फोडली. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध चांगलाच असंतोष खदखदत आहे.
070721\img-20210703-wa0136.jpg
धर्मापूर पेठेतील कचराकुंड्या कच-याने अशा तुडूंब भरल्या असुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.