---------------------
सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उजेडात
----
टोळीकडून अनेक महिला-मुलींची विक्री
----
नागपूरसह गुजरातमधील दलालांचा समावेश
------------------------------
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लग्नाच्या नावाखाली साैदा करून एका गरीब कुटुंबातील तरुणीची दोन वेळा विक्री केल्याचे संतापजनक प्रकरण पुढे आले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या प्राथमिक चाैकशीत तरुणीची विक्री करणाऱ्यांमध्ये नागपूरसह गुजरातमधील दलालांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टोळीने यापूर्वीही अनेक तरुणींची अशाच प्रकारे विक्री केल्याचा एकूणच घडामोडीवरून संशय निर्माण झाला आहे.
पीडित तरुणी सीमा (नाव बदललेले, वय २२) बिडीपेठ, सक्करदऱ्यात राहते. तिच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आईवडील आहेत. घरची परिस्थिती जेमतेम आहे. चुणचुणीत अन् दिसायला बऱ्यापैकी असलेल्या या तरुणीकडे तरुणींना फूस लावून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील बेबी ठाकरेची नजर गेली. ऑगस्ट २०२० मध्ये तिने सीमाच्या आई कल्पना (काल्पनिक नाव)वर जाळे फेकले. गुजरातमध्ये एका चांगल्या कुटुंबातील इंजिनियर मुलगा लग्नासाठी तयार असल्याचे ठाकरेने सांगितले. एवढ्या दूर मुलीला द्यायचे नाही, असे सांगून कल्पनांनी तिचा प्रस्ताव ठोकरला. त्यामुळे ठाकरेने सीमाला फूस लावली. इंजिनियर मुलगा नवरा म्हणून मिळेल. चांगले घर आणि त्यामुळे तू सुखी होशील.तुझ्या कुटुंबीयांनाही आधार देऊ शकशील, असे म्हटले. सीमाला ते पटले अन् नंतर पहिल्याच फेरीत ठाकरेसोबत सीमा, तिची आई कल्पनासह अहमदाबाद (गुजरात)ला पोहचली. तेथे शांताबाई पटेलच्या मध्यस्थीने धवलकुमार भाईचंद्र पटेल नामक व्यक्तीसोबत १८ सप्टेंबरला सीमाचे लग्न लागले.
---
सहा महिन्यानंतर भंडाफोड
काही दिवस चांगले गेल्यानंतर रुळलेली सीमा घरात हक्क दाखवू लागल्याने तिच्या घरात कुटुंबकलह वाढला. दिराने तिला हक्क दाखवू नको, तुला दोन लाख रुपये मोजून विकत घेतले, असे म्हटले. त्यामुळे सीमाने आईला फोन करून येथे बेबी ठाकरेने आपल्याला विकल्याचे सांगितले. त्यावरून बेबी ठाकरेला जाब विचारल्यानंतर कल्पना तडक अहमदाबादला पोहचल्या. तेथे शांताबाई पटेलच्या घरी लग्नाच्या नावाखाली सीमाची खरेदी विक्री झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांत जाऊ नये म्हणून शांताबाईने कल्पना यांच्या हातात जबरदस्तीने २० हजार रुपये ठेवून प्रकरण दडपले. कल्पना नागपुरात परतल्या अन् तिकडे सीमाचा छळ वाढतच गेला. तो असह्य झाल्यामुळे सीमा २७ मार्च २०२१ ला माहेरी परतली.
----
दुसऱ्या अंकाची सुरुवात
दीड-दोन महिने झाल्यानंतर सीमाची समजूत काढून तिला सासरी परतण्यासाठी आईने तयार केले. या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेली पार्वतीबाई त्रिपाल हिने आपल्याला राजकोटला जायचे आहे म्हणून मायलेकीची सोबत धरली. सीमा, तिची आई अन् पार्वताबाई अशा तिघी सीमाच्या कथित सासुरवाडीत अहमदाबादला ५ मे रोजी पोहचल्या. सीमाच्या घरी वाद सुटण्याचे नाव घेत नव्हते. अशात १८ मे रोजी पार्वताबाई सीमाच्या घरी पोहचली अन् तिने सीमा तसेच तिच्या आईला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाऊ असे सांगून राजकोटला नेले. घोडाजी गावात पार्वताबाईची साथीदार बेबी पराते आणि रेखा कुसरे एका पुरुषासोबत आली. त्यांनी सर्वांनी मिळून दीड लाखात सीमाला बिपीन पटेलला विकले. मायलेकींनी विरोध केला असता त्यांना बलात्कार करून मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
----
कल्पना यांनाही विकण्याचा प्रस्ताव
मुलीला सासरी पोहचविण्याच्या हेतूने नागपुरातून निघालेल्या कल्पना यांना या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला. राजकोट जवळच्या घोडाजी गावात सीमाला अनोळखी गुंडांच्या तावडीत ठेवून त्या नागपूरकडे निघाल्या. सोबत पार्वतबाई त्रिपाल, बेबी पराते आणि रेखा कुसरे होत्या. धावत्या रेल्वेेत कल्पना यांनी या तिघींना मुलीला विकल्याबद्दल त्यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी आरोपी महिलांनी तिला धावत्या रेल्वेतून फेकून देण्याची धमकी दिली. काही वेळानंतर तुझे वय जास्त नाही. तू इंदोरला चल, तेथे तुला ५० हजारात एकाला विकतो. आम्ही ३० हजार ठेवू तुला २० हजार देऊ असे सांगून कल्पना यांनाही विकण्याचा प्रस्ताव ठेवला.
----