दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेमार्गाने हजारोंच्या संख्येने देशभरातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. अनेकदा अनुयायी पायदानावर बसून प्रवास करतात, कोचच्या दारावर उभे राहतात, टीसीने मनाई केली असता तात्पुरते ऐकून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा अनुयायांच्या समुपदेशनासाठी रेल्वे सुरक्षा दलाने अनोखी शक्कल शोधून काढली असून आरपीएफचे २५ जवान निळ्या टोप्या घालून अशा अनुयायांचे समुपदेशन करणार आहेत. आपलाच कुणी बांधव समजूत घालत असल्याचे पाहून अनुयायी त्यांना त्वरित प्रतिसाद देत असल्याचा अनुभव रेल्वे सुरक्षा दलाला मागील पाच वर्षांपासून येत आहे.रेल्वेस्थानकावर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो अनुयायी देशभरातून दाखल होतात. यातील अनेक अनुयायी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करतात. अशा प्रकारे प्रवास करणे रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा आहे. अनेकदा यामुळे जीवितहानीही होऊ शकते. तर काहीजण कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. तोल गेल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. गाडीतील टीटीई अशा प्रवाशांना मज्जाव करतात. परंतु प्रवासी त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर अनेकदा जनरल कोचमध्ये जागा नसल्यामुळे अनेकजण स्लिपर क्लास कोचमध्ये चढतात. यामुळे तेथील प्रवाशांना त्रास होतो.अशा परिस्थितीत कुणी संबंधित अनुयायांना समजून सांगितल्यास त्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे २५ आरपीएफ जवान निळ््या टोप्या घालून कर्तव्य बजावणार आहेत. नियमांचा भंग करताना कुणी प्रवासी दिसल्यास संबंधीतास ते त्यापासून परावृत्त करतील. आपल्यापैकीच कुणी बांधव समजावित असल्याचे पाहून अनुयायी संबंधित निळी टोपी घातलेल्या जवानांचे म्हणणे पटकन ऐकतात, असा आरपीएफचा आजवरचा अनुभव आहे. रेल्वेस्थानकावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होऊन रेल्वे नियमांचाही भंग होत नाही.
धम्मचक्र प्रवर्तन दिन; नागपुरात निळ्या टोप्या घालून आरपीएफ जवानांची ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:23 AM
रेल्वेमार्गाने हजारोंच्या संख्येने देशभरातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. अनेकदा अनुयायी पायदानावर बसून प्रवास करतात. अशा अनुयायांचे समुपदेशन आरपीएफचे २५ जवान निळ्या टोप्या घालून करणार आहेत.
ठळक मुद्देअनुयायांचे समुपदेशन करणारसुरक्षेकडे देणार लक्ष