नागपूर : धरमपेठच्या व्हीआयपी रोडवर गुंडगिरी दाखविण्यासाठी तरुणाची नाहक हत्या करण्याच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. अल्पवयीन असणारा आरोपी हा प्रत्यक्षात वयस्क निघाला आहे. शाळेच्या दाखल्यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे.
२६ मार्चच्या पहाटे चंद्रपूर येथील ईश्वर बोरकर या २३ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता. उपचारादरम्यान ईश्वरचा मृत्यू झाला. पोलिसांनी २१२१ वर्षीय अनिश संजय हिरणवार याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी वयस्क असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी सादर केलेल्या आधार कार्डची तपासणी केली. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या आधार कार्डनुसार अल्पवयीन मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. पोलिसांनी सोमवारी या अल्पवयीन मुलाचा धरमपेठ शाळेतून दाखला मिळवला. यामध्ये, अल्पवयीन मुलाच्या जन्म तारखेनुसार सप्टेंबर २०२२ मध्येच तो १८ वर्षांचा झाला असल्याचे सत्य समोर आले.
या दाखल्याच्या आधारे पोलिसांनी बाल समितीकडे अर्ज केला आहे. मंगळवारी बाल समितीचा निर्णय आल्यानंतरच पुढील पावले उचलण्यात येतील. सूत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारात अल्पवयीन मुलाच्या वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी पोलिसांसमोर आधार कार्ड सादर करून मुलगा अल्पवयीन असल्याचे सांगितले. आधार कार्ड सादर करण्याचा हेतू हा तपासाचा मुद्दा आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ईश्वरचे नातेवाईक करत आहेत.