नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बांधकामस्थळी आठवड्याभरात दुसऱ्यांदा अपघात झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षात समृद्धीच्या कामाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले. म्हणून बांधकामाचा दर्जा घसरला. या बांधकामाचं क्वालिटी ऑडिट व्हावं अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गाच्या अपघातानंतर याविषयी आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धीच्या बांधकामाचा दर्जा महाविकास आघाडी सरकारच्या काळात घसरल्याचे जाणवते आहे. या बांधकामाची गुणवत्ता राज्य सरकारने तत्काळ तपासावी. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात समृद्धीच्या निर्माणकार्याचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक होत होती. या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहून बारीकसारीक गोष्टींच्या गुणवत्तेची शहानिशा करायचे. २०१९ साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र त्यानंतर राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. म्हणून समृद्धी महामार्गाचे क्वालिटी ऑडिट गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.
अपघात होत आहेत याचाच अर्थ बांधकामात हयगय झाल्याचे जाणवते आहे. हा महामार्ग नियोजित आराखड्यानुसार बांधण्यात आला का ? त्याचा डीपीआर काय होता आणि त्यानुसार बांधकाम झाले का ? याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार श्रेया लाटण्याच्या नादात उद्घाटनाची घाई करते आहे. मुळात राज्य सरकारकडे अजून अडीच वर्ष असताना सरकारला घाई करायला नको. आधी समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होऊ द्या आणि नंतरच उद्घाटन करा अशी मागणीही आ. बावनकुळे यांनी यावेळी केली.