नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोनी येथील एका खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. रणजित ईश्वर राठोड आणि बंडू सुरेश पवार, अशी आरोपींची नावे आहेत. शालिक जाधव, असे मृताचे नाव होते. प्रकरण असे की, जुनोनी गावात राहणारी मृत शालिकची वहिनी रेखाबाई जाधव ही १३ मे २०१५ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास प्रातर्विधीसाठी उठली असता तिला तिच्या घराच्या समोर ईश्वर राठोड, विलास राठोड, रणजित राठोड, बंडू पवार, रतन जाधव, सूरज पवार, संजय पवार आणि लक्ष्मण राठोड हे शालिक जाधव याच्यावर काठी, कुऱ्हाड आणि तुतारीने हल्ला करताना दिसले होते. ही घटना रेखाबाईचा जावई गणेश राठोड यानेही पाहिली होती. लागलीच रेखाबाईने ही घटना आपले पती रामप्रसाद जाधव यांना सांगितली होती. शालिकचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला होता. आरोपी रणजित राठोड याचे राणी नावाच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. उमरेड येथे राणीला रणजित राठोड याच्यासोबत पाहताच संतप्त झालेल्या शालिकने त्याला जबरदस्त मारहाण केली होती. या मारहाणीबाबत धडा शिकवण्याच्या हेतूने रणजित आणि अन्य आरोपींनी शालिकचा निर्घृण खून केला होता. रेखाबाईच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. आरोपींपैकी रणजित राठोड आणि बंडू पवार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. मीर नगमान अली यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
जुनोनी खुनातील दोघांना जामीन
By admin | Published: February 25, 2017 3:02 AM