नागपूर : तोतया पोलीस बनून एका कंपनीतील कर्मचाऱ्याला १० लाख रुपयांनी लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी २४ तासांच्या आत या आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक तीन व वाहन चोरी तपास पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
१३ जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोनी फ्रेंड्स प्रा.लि.मध्ये सेल्समनचे काम करणारा अनुराग अरुण पांडे (२५) हा बॅगमध्ये १० लाख रुपये घेऊन लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकात गेला होता. तो दुचाकी पार्किंगमध्ये उभी करून जमुना अपार्टमेंटमध्ये जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवून बॅगमध्ये गांजा आहे का अशी विचारणा केली. तुला पोलीस ठाण्यात चलावे लागेल असे म्हणत अनुरागला तो व्यक्ती बाहेर घेऊन गेला. त्याचा साथीदार एमएच ४० सीजी ३२६२ या दुचाकीवर बसून होता. दोघेही अनुरागला जुना भंडारा मार्ग, हरीहर मंदिराजवळ घेऊन गेले.
बॅग तपासणीच्या नावाखाली त्यांनी त्याला खाली उतरवले व बॅग घेऊन फरार झाले. अनुरागच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीन व वाहन चोरी तपास पथकाकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध केला. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मंगेश नारायण डेहनकर (३१, लोणारा, कळमेश्वर), सागर अशोक पाटील (३४, कळमेश्वर) यांना कळमेश्वरमधून ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली. अनुरागकडून बॅग लुटल्यानंतर ते कळमेश्वरला गेले होते. त्यांच्या ताब्यातून साडेनऊ लाख रुपये रोख, दुचाकी जप्त करण्यात आले. त्यांना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, मधुकर काठोके, दशरथ मिश्रा, ईश्वर खोरडे, संतोषसिंग ठाकूर, अनिल बोटरे, दीपक लाखडे, जितेष रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, अनिल इंगोले, झिंगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
टीप कुणी दिली ?
दरम्यान, या प्रकरणात आरोपींना टीप कुणी दिली याची चौकशी सुरू आहे. अनुराग हा पेंट व्यापाऱ्याकडे काम करत असला तरी पैसे हवाल्याचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींना या पैशांची टीप मिळाली होती. त्याचा शोध सुरू आहे. इतवारी, लकडगंज भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी हवालामध्ये गुंतले आहेत. दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. अशा स्थितीत या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.