नागपूर : आईसोबत श्रीकृष्ण मंदिरात गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र पळविणाऱ्या दोन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड करून ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोशन बाबुराव कांबळे (२८, रा. हनुमान मंदिर, ग्रामपंचायतजवळ, बेलतरोडी) आणि प्रल्हाद नंदकिशोर चकोले (३४, रा. भेंडा आटाचक्कीजवळ, हुडकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २१ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता मेघा मुरलीधर चरडे (४८, रा. रामचंद्रनगर, बेसा रोड मानेवाडा) या आपल्या आईसोबत रामचंद्रनगर येथईल श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन करून परत येत असताना दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पळ काढला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
गुन्ह्याच्या तपासात हुडकेश्वर पोलिसांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, उपनिरीक्षक माधव गुंडेकर, हवालदार संतोष सोनटक्के, मनोज नेवारे, विजय सिन्हा, संदीप पाटील, मंगेश मडावी यांनी केली.