नागपूर : तब्बल १२ वर्षे म्हणजे पूर्ण एक तप शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डि.एड. पात्रताधारकांच्या मागचे शुक्लकाष्ट संपताना दिसत नाही. यंदा भरतीची प्रक्रिया सुरू करून टीएआयटी (टेट) परीक्षा घेण्यात आली. त्यात २.१६ लक्ष उमेदवारांनी परीक्षा दिली. निकालही लागले पण पुढे भरतीचे घोडे अडकून पडले.
डि.एड. ची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी अनास्थेचा सामना करावा लागतो आहे. २०१२ पासून सरकारने शिक्षकांच्या भरत्या बंद केल्या होत्या. ते शुक्लकाष्ट यंदा संपण्याचे चित्र तयार झाले होते. यावर्षी राज्य सरकारने शिक्षकांच्या ३० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. अतिशय वेगवान पाऊले उचलत २१ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत टेटची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत राज्यातील २ लाख १६ हजार उमेदवारांनी सहभाग घेतला होता. लगोलग २४ मार्चला निकालही लावण्यात आले. दरम्यान या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत काही विद्यार्थी न्यायालयात गेले आणि पुन्हा प्रतीक्षेतील उमेदवारांवर निराशेचे सावट पसरले.
दरम्यान उमेदवारांच्या मते न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे निर्देश न देताही सरकारने भरती थांबविली, जी आजतागायेत थांबलीच आहे. साडे तीन महिने लोटूनही सरकारने यासाठी कुठलेही पाऊले उचलली नसल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. यादरम्याने नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने भरतीवरील स्थगिती उठविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतातरी सरकार वेगाने हालचाली करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२०१७ चीही भरती अशीच रखडली
२०१७ मध्ये सरकारने १९६ संस्थामधील १२ हजार शिक्षकांच्या पदासाठी भरती काढली होती. ही प्रक्रिया २०१९ पर्यंत चालली व यातील ७ हजार जागा भरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कोरोनाच्या कारणाने ही भरतीही रखडली, जी अद्यापही पुढे सरकली नाही.
सेवानिवृत्तांच्या परिपत्रकानेही असंतोष
दरम्यान सरकारने जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले. त्यांना २० हजार मानधन देण्याची घाेषणा करण्यात आली. या आदेशामुळेही पात्रताधारक बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.
किचकट प्रक्रियेतून जावे लागते
डि.एड. झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र होण्यासाठी आधी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा द्यावी लागते. यानंतर ते टेटसाठी पात्र ठरतात. या प्रक्रियेमुळेसुद्धा उमेदवारांची ससेहोलपट होत आहे.