नागपूर : रशिया आणि युक्रेन या देशांमधील युद्धामुळे गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी ५०,५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात तब्बल अडीच हजारांची वाढ होऊन ५३ हजारांवर पोहोचले. त्यासोबतच चांदीच्या दरात प्रति किलो ३,५०० रुपयांची वाढ होऊन बुधवारच्या ६५,५०० रुपयांच्या तुलनेत भाव ६९ हजारांवर गेले. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुढे आणखी किती वाढणार हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
बाजारात सकाळच्या सत्रात युद्धाचे वृत्त येताच सोने १३०० रुपयांनी आणि चांदी १४०० रुपयांनी वधारली. एक तासानंतर सोने पुन्हा २०० रुपयांनी वाढून ५२ हजार तर चांदी ४०० रुपयांनी वाढून ६७,३०० रुपयांवर गेली. त्यानंतर दुपारच्या सत्रात सोने ५०० रुपये आणि चांदीत १२०० रुपयांची वाढ झाली. अखेरच्या सत्रात सोने २०० रुपयांनी वाढून ५३ हजार आणि चांदी ५०० रुपयांची वाढ होऊन ६९ हजारांवर स्थिरावली. एकाच दिवसात सोन्यात अडीच हजार आणि चांदीत साडेतीन हजारांची वाढ झाली. युद्ध सुरूच राहिल्यास आणखी भाववाढीची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.