नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे क्रॉसिंग गेटला पर्याय म्हणून बांधण्यात आलेल्या नवीन रोड अंडर ब्रीज (आरयूबी) चा वापर कसा करायचा, त्या संबंधाने जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वेने थेट विद्यार्थ्यांसोबतच संवाद करण्याचा मार्ग निवडला आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या गाव-शहराशेजारी हे ब्रीज बांधण्यात आले. त्या गावांतील विविध शाळांशी संपर्क करून तेथील विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नव्याने ३६ आरयूबीची निर्मिती करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारीला त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी या आरयूबीचा वापर कसा करायचा, त्यासंबंधाने नागरिकांना, खास करून विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. बुटीबोरी, धामणगाव, पांढूर्णा, कळमेश्वर, वरोरा, आमला, मुलताई, घोडाडोंगरी या गाव-शहराच्या आजुबाजुला हे अंडर ब्रीज असल्यामुळे त्या भागातील ६२ शाळांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांनी संपर्क केला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध आणि रेखाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 'विकसित भारत, विकसित रेल्वे' अशी या स्पर्धेची संकल्पना आहे. त्यात आतापर्यंत एकूण २४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन२६ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी या आरयूबींचे आभासी पद्धतीने लोकार्पण करतील. त्यावेळी ठिकठिकाणी 'संवाद' कार्यक्रमांचे रेल्वे प्रशासनाने आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ६२ शाळांमधील विद्यार्थी, त्यांचे कुटुंबिय, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. याचवेळी स्पर्धेत अव्वलस्थानी आलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.