निशांत वानखेडे
नागपूर : ग्लाेबल वार्मिंगचा प्रभाव आता भारतातही दिसायला लागला आहे. त्यामुळेच जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी देशभरात जंगलामध्ये अग्निकांडाच्या ३ लाख ४५ हजार ९८९ घटना नाेंदविण्यात आल्या. जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक वणव्यांची नाेंद ही राज्यात गडचिराेली जिल्ह्यात झाली आहे.
देशातील एकूण वनक्षेत्रापैकी ११.६६ टक्के क्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण मानले जाते. यामध्ये मिझाेरम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर या पूर्वाेत्तर राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील काही भागांचा समावेश आहे. वणव्यांचा अलर्ट ‘माेडिस’ आणि एसएनपीपी-व्हीआयआयआरएस या दाेन प्रणालीद्वारे केला जाताे. माेडिस प्रणालीद्वारे नाेव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात ५२,७८५ वणव्यांच्या नाेंदी झाल्या तर एसएनपीपीद्वारे ३,४५,९८९ वणवे नाेंदविण्यात आले. २०१८-१९ मध्ये देशांत जंगलामध्ये २,१०,२८६ आगी लागल्या. २०१९-२० या वर्षात मात्र त्यात दिलासादायक घट झाली. यावर्षी १,२४,४७३ वणवे नाेंदविण्यात आले. २०२०-२१ साली मात्र यामध्ये अडीच पट वाढ झाली.
ओडिशामध्ये सर्वाधिक ५१,९६८ वणवे नाेंदविले गेले पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील गडचिराेली जिल्ह्यात सर्वाधिक १०,५७७ वणवे लागले. जंगलात अग्नितांडव झालेल्या टाॅप १० राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागताे. ३४,०२५ वणव्यांसह महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर आहे.
वणवे पेटलेले टाॅप टेन राज्य
*राज्य वणव्यांच्या घटना*
ओडिशा - ५१,९६८
मध्य प्रदेश - ४७,७९५
छत्तीसगड - ३८,१०६
महाराष्ट्र - ३४,०२५
झारखंड - २१,७१३
उत्तराखंड - २१,४८७
आंध्रप्रदेश - १९,३२८
तेलंगणा - १८,२३७
मिझाेरम - १२,८४६
आसाम - १०,७१८
२२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण
देशाच्या भूभागापैकी ७ लाख १३ हजार ७८९ चाैरस किमीचे वनक्षेत्र आहे. यातील २.८१ टक्के अत्याधिक, ७.८५ टक्के तीव्र आणि ११.६१ टक्के वनक्षेत्र अती, असे २२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण गटात माेडते. महाराष्ट्राचे ४,०५६ चाै.किमी. म्हणजे ७.६ टक्के वनक्षेत्र अग्निप्रवण गटात माेडते. राज्यात २०१९-२० साली १४,०१८ वणवे तर २०२०-२१ साली ३४,०२५ वणवे लागले.