लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हेगारांची स्वतंत्र वसाहत असा समज असल्याने कारागृहाकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. कारागृहात एकापेक्षा एक खतरनाक गुन्हेगार, समाजकंटक असतात. ते कारागृहात राहिले तरच समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदेल, असे म्हटले जायचे. काही अंशी ते खरे असले तरी कारागृहात डांबले जाणारे सर्वच जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे अथवा समाजकंटक नसतात, हे सुद्धा खरे आहे. परिस्थितीने त्यांना कारागृहात पोहचवले, हे ध्यानात घेऊन पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य कारागृह प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कारागृहाला सुधार अन् पुनर्वसनाच्या वाटेवर आणले अन् नंतर वेगवेगळे उपक्रम कारागृहात राबवले जाऊ लागले. वेगवेगळ्या कलांमध्ये निष्णात असलेल्यांच्या कलागुणांना वाव मिळू लागला. गळा भेट आणि बंदिवान रजनीसारखे कैद्यांच्या मानसीकतेत सकारात्मक बदल घडवून आणणारे उपक्रम सुरू झाले.
विद्यमान राज्य कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांनी कैद्यांमधील काैशल्याचा योग्य तो वापर करण्यावर भर दिला आहे.
कारागृहातील परंपरागत शेतीला नवी जोड मिळाली. या शेतीत तांदूळ पिकवला जाऊ लागला. टोमॅटो, कोहळे (कद्दू), पालक, मेथी, मिरची, वांगी पिकवली जाऊ लागली. शेतीचे ज्ञान असलेले बंदिवान भरघोस पीक काढू लागले अन् त्याचा कैद्याच्या आहारातही वापर केला जाऊ लागला. कमवा आणि खा सोबतच पिकवा आणि खा ही नवी संकल्पना रुजली. नागपूर कारागृहात यावर्षी १६ क्विंटल तांदळाचे उत्पादन घेण्यात आले.
---
रोज शिजतो दोन क्विंटलचा भात
कारागृहात कैद्यांचे जाणे येणे सुरूच राहते. मात्र, २२०० ते २३०० कैदी कारागृहात असतातच. रोज सरासरी २ क्विंटल तांदूळ कारागृहात शिजवावा लागतो. कैद्यांची संख्या अन् रोजचा आहार लक्षात घेतला तर हे उत्पादन खूप जास्त वाटणार नाही. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केला तर १६ क्विंटलचे उत्पादन कमीही म्हणता येणार नाही.
---
पालेभाज्याही कारागृहाच्याच
सोबतच रोज निघणारे टोमॅटो, पालक, वांगी, मेथी, कोहळे तसेच अन्य भाज्यांचाही कैद्यांच्या रोजच्या जेवणात वापर केला जातो.
---
एकूण कैदी - २३००
पॅरोलवर बाहेर असलेले कैदी - ६००
गंभीर गुन्ह्यातील कैदी - १२००
----
कैद्यांकडून करून घेतले जाणारे काम
कारागृहात कैद्यांकडून शेतीसोबतच विविध प्रकारची कामे करवून घेतली जातात. विणकाम, सुतारकाम ही परंपरागत कामे होतातच. मात्र, नागपुरात खादीपासून अत्यंत दर्जेदार असे कापड तयार करवून घेतले जाते. येथील राख्या तर अप्रतिम असतात. सतरंजी अन् छोट्या छोट्या हस्तकलेच्या वस्तूची निर्मिती केली जाते. मिळालेल्या ऑर्डरनुसार तसेच कारागृहात प्रदर्शन लावून त्याची विक्री केली जाते.
---
मास्कची मोठ्या प्रमाणात निर्मिती
कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले असताना कारागृहातील अधिकाऱ्यांनी मात्र बंदिवानांकडून या कालावधीत मास्क तयार करवून घेतले. दीड वर्षांत जवळपास १६ लाख मास्कची निर्मिती झाली. विविध शासकीय विभागाने हे मास्क विकत घेतले होते.
----
फर्निचरही दर्जेदार
मध्यवर्ती कारागृहात उत्कृष्ट फर्निचर निर्माण केले जाते. या फर्निचरची सुबकता अन् दर्जा बघता न्यायालयाने येथील मध्यवर्ती कारागृहाला फर्निचरचा मोठा ऑर्डर दिला होता. गेल्या वर्षभरात ५० लाखांच्या फर्निचरची निर्मिती करण्यात आली.
----
सुधारणा, स्वावलंबनावर भर
कारागृहात बंदिस्त कैद्यांचे समुपदेशन करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावर तसेच त्यांना कसे स्वावलंबी करता येईल, यावर आमचा भर आहे.
अनुपकुमार कुमरे
कारागृह अधीक्षक, नागपूर
----