नागपूर : ऑम्लेटच्या गाड्यावर काम करणाऱ्या कामगाराला खंडणी मागून मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.
शुभम धनराज उईके (वय ३०, रा. मायानगर, गल्ली नं. २ जरीपटका) आणि असलम अजहर काजी (वय २०, रा. मिसाळ ले आऊट, पाटनकर चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदोरा मैदान आयटीआय समोरील बसस्टॉपच्या बाजुला सुजाता अंबर करवाडे या अंडा, ऑम्लेट, चिकन पकोडाचा गाडा चालवितात. त्यांच्या गाड्यावर सक्षम आनंद मेश्राम (वय २३, रा. ललित कला भवनजवळ, मायानगर, जरीपटका) हा कामगार म्हणून कार्यरत आहे.
बुधवारी रात्री ९.१५ वाजता आरोपी दुचाकीने ऑम्लेटच्या गाड्यावर आले. यातील शुभमने सक्षमला अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तुम्हाला येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील’ अशी धमकी देऊन हातबुक्क्यांनी मारहाण केली. सुजाता अंबर करवाडे या सक्षमला वाचविण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांनाही शिविगाळ केली. या प्रकरणी सक्षम मेश्राम याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटकाचे उपनिरीक्षक बालाप्रसाद टेकाळे यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८४, २९४, ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.