नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी ८ जूनला सकाळी ८.२० वाजताच्या दरम्यान दोन आरोपींना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीबी वॉर्ड क्वार्टर परिसरातील दुर्गा मंदिराजवळ २२.९ ग्रॅम एमडीसह अटक केली.
जितू नंदू गोराडे (३४, रा. बाराखोली, धम्मकुटी विहाराजवळ, जरीपटका) आणि यश बबलू तोमस्कर (२१, रा. टी. बी. वॉर्ड इमामवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जितू हा शासकीय योजनांचा प्रचार करण्याचे काम करतो, तर यश हा शिक्षण घेत आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज घुरडे, सिद्धार्थ पाटील, हवालदार राहुल पाटील, मनोज नेवारे, अमंलदार रोहित काळे, सुभाष गजभिये यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जितू गोराडे याने यश तोमस्कर याचा भाऊ कार्तिक (वय २४) याच्याकडे एमडीची मागणी केली होती. त्यानुसार कार्तिकने आपला भाऊ यशच्या हाताने जितूला २ लाख ९९ हजार रुपयांचे २२.९ ग्रॅम एमडी नेऊन देण्यास सांगितले. परंतु पोलिसांनी सापळा रचून दोघांना एमडीसह अटक केली. यातील फरार आरोपी कार्तिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे. तो सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना इमामवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.