नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव शिवारात रविवारी (दि. १६) सकाळी केलेल्या कारवाईमध्ये दाेघांना अटक करीत त्यांच्याकडून दाेन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतूस जप्त केले. दाेघेही सराईत गुन्हेगार व चाेरटे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
हर्षित ऊर्फ अमित श्रीआनंदकुमार पांडे (२१, रा. पश्चिम सरिरा, ता. मंजनपूर, जिल्हा काेसंबी, उत्तर प्रदेश) व लवलेश पप्पू निसाद (२१, रा. पुरानी बाजार, करवी, जिल्हा चित्रकूटधाम, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चाेरी प्रकरणातील आराेपींचा शाेध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नांदगाव (ता. सावनेर) शिवारातील बंद असलेल्या एका कंपनीच्या आवारात दाेघे देशी कट्टे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली हाेती.
परिणामी, या पथकाने घटनास्थळ गाठले आणि सापळा रचून शिताफीने दाेघांनाही ताब्यात घेत झडती घेतली. यात त्यांच्याकडे दाेन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतूस आढळून आल्याने पाेलिसांनी ते जप्त करीत दाेघांनाही अटक केली. त्याची एकूण किंमत ६४ हजार रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली असून, त्यांच्याकडून जबरी चाेरीच्या माेठ्या घटना उघड हाेण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
देशीदारूच्या दुकानात लुटमार
आपण कामानिमित्त २९ डिसेंबर २०२१ ला नागपूर जिल्ह्यात आल्याची माहिती दाेघांनीही पाेलीस अधिकाऱ्यांना दिली. फिरण्यासाठी वाहन नसल्याने त्यांनी पिपळा (डाकबंगला) (ता. सावनेर) येथून माेटरसायकल चाेरून नेली हाेती. त्या दाेघांना पाेटा (ता. सावनेर) येथील देशीदारूच्या दुकानात लुटमार केल्याचे लवलेश निसादने कबूल केले आहे. त्याने दुकान व्यवस्थापकाच्या डोक्यावर कट्टा राेखून १९ हजार रुपये राेख, आठ हजार रुपयांचा माेबाईल फाेन, चार हजार रुपयांची सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर चाेरून नेल्याचे कबूल केले. माेबाईल फाेन व डीव्हीआर राेहणा येथून पारशिवनीकडे जाताना कन्हान नदीत फेकल्याचेही त्याने सांगितले.याप्रकरणी खापा पाेलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.