नागपूर : कर्जाचे १३ हजार रुपये परत न करण्याच्या वादातून जरीपटक्यातील कुख्यात गुंड अजय गाते याने साथीदारांच्या मदतीने अमन नागदेवतेचा खून केला. आश्चर्याची बाब म्हणजे अमनच्या ‘इन्स्टाग्राम पोस्ट’मुळे अजयच्या पायाची आग मस्तकात गेली आणि त्याने अमनचा जीव घेतला. पोलिसांनी हे गूढ उकलून अजय व त्याचा साथीदार कैलास भगवानदास मसराम (वय २७, रा. राजनगर खदान, सदर) याला अटक केली आहे.
रविवारी दुपारी जरीपटका येथील इटारसी पुलाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला अमनचा मृतदेह आढळून आला. अमनचे डोके दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तेव्हापासून जरीपटका पोलीस आरोपीच्या शोधात गुंतले होते. तपासात अमनचा अजय गाते याच्याशी वाद झाल्याचे पोलिसांना समजले. रविवारी सकाळी अजय आणि कैलास सोबत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. हत्येची माहिती मिळाल्यावर दोघांनीही काहीच माहिती नसल्याची भूमिका घेतली; परंतु पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी सर्व सत्य मांडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनची आई मुंबईत राहते. अमनला त्याच्या आईबद्दल खूप जिव्हाळा होता. अमनने अजयकडून १३ हजार रुपये उसने घेतले आणि आईला दिले. काही दिवसांपासून अजय अमनवर पैसे परत मागण्यासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली. हे अमनने त्याच्या आईलाही सांगितले होते.
दरम्यान, पैसे परत न केल्याने चिडलेल्या अजयने अमनकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. अजयच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने अमनचे इन्स्टाग्राम अकाउंट तपासले तेव्हा त्यात त्याला हानी पोहोचविण्यात आल्याचा उल्लेख होता. अमनने अजयबद्दल 'तो भिगी बिल्ली झाला असून मला घाबरला आहे, म्हणूनच मी रात्री उशिरापर्यंत घरी राहत नाही' अशी पोस्ट केली होती. हे वाचून संतापलेल्या अजयने अमनला मारण्याचा कट रचला. रविवारी सकाळी त्यांनी अमनला घटनास्थळी बोलावले. तेथे कैलासच्या मदतीने कुऱ्हाडीच्या काठीने त्याच्या डोक्यावर वार करून त्याला बेशुद्ध केले. यानंतर दगडाने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली व दोघेही फरार झाले. ही कारवाई पीएसआय संतोष बकाल, पीएसआय राजकुमार त्रिपाठी व त्यांच्या पथकाने केली.
मैत्रिणीच्या वडिलांची केली होती हत्या
या हत्येचा मुख्य सूत्रधार अजय गाते हा हत्येच्या गुन्ह्यात अडकला होता. २०१८ मध्ये त्याने साथीदारांच्या मदतीने कळमेश्वर येथे मैत्रिणीच्या वडिलांची हत्या करून मृतदेह जाळला. या प्रकरणात तो बराच काळ तुरुंगात होता. जामिनावर सुटल्यानंतर तो परत सक्रिय झाला. त्याच्यावर खून, तस्करी, दारू तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.