लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नांद) : दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोघेही मंगळवार(दि. १६)पासून घरी परत आले नव्हते. शिवाय, ते दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात उमरेड व भिवापूर तालुक्यातून दारूचा पुरवठा करण्याचे काम करायचे. याच व्यवसायातील वैमनस्यातून दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.संतोषसिंग अवतारसिंग तिलबितिया (२४) व संगतसिंग अवतारसिंग तिलबितिया (२२) रा. महालगाव, ता. भिवापूर अशी मृतांची तर, दसरतसिंग बलवीरसिंग तिलपितिया, जयसिंग बलवीरसींग तिलपितिया, दीपकसिंग बलवीरसींग तिलपितिया दोघेही रा. सिर्सी, ता. उमरेड व राजू ऊर्फ गणप्या राऊत रा. महालगाव, ता. भिवापूर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही दारूच्या पेट्या चिमूर (जिल्हा चंद्रपूर) तालुक्यातील पोहोचविण्यासाठी मंगळवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या एमएच-४०/एएफ-०७९० क्रमांकाच्या मोटरसायकलने घराबाहेर पडले होते. त्या दिवशी दारूच्या पेट्या पोहोचवून ते महालगाव येथे परतही आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाही. दोघांचेही मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने, त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.परिणामी, बुधवारी (दि. १७) बेला पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिर्सी पोलीस चौकीत दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, सोमवारी (दि. २२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास बेल्लारपार येथील गुराख्यास लाकडाच्या ढिगातून दुर्गंधी आल्याने दोघांचेही मृतदेह या जंगलात आढळून आले. दगडाने वार केल्याने त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. माहिती मिळताच बेला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी बेला पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर करीत आहेत.अवैध दारूविक्रीला सुगीचे दिवसचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाल्यापासून तिथे नागपूर जिल्ह्यातून रोज मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा पुरवठा केला जातो. त्यामुळे उमरेड व भिवापूर तालुक्यातील दारूविक्रेत्यांसोबतच ती दारू सुखरूप चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्याच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे या भागात काही जण गटागटाने दारू पोहोचविण्याचे काम करतात. ते उमरेड व भिवापूर तालुक्यातील दारू नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या भान्सुली (ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर)च्या जंगलात नेतात. तिथे ती चिमूर तालुक्यातील दारू पोहोचविणाºयाला हस्तांतरित करतात आणि माघारी परततात.पावसाची दडी व दुर्गंधीमुळे बिंग फुटलेदोघेही दारूच्या पेट्या पोहोचविल्यानंतर मोटरसायकलने जंगलमार्गे गावाला परत येत होते. नाल्याच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडविली व डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर चौघांनीही त्यांच्यावर दगडाने वार केले. दोघांनाही नाल्याच्या खोलगट भागात फेकून देत चौघांनी तिथून पळ काढला. त्यांच्या अंगावरील वस्तूही पिशवीत टाकून नाल्यात फेकल्या. मृतदेह लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी त्यावर लाकडं व काटेरी फांद्या रचल्या. नाल्याच्या पुरात दोन्ही मृतदेह वाहून जाईल, असा अंदाज त्यांनी लावला होता. परंतु, पावसाची दडी व मृतदेहांची दुर्गंधीमुळे बिंग फुटले.त्यांची मोटरसायकल व मोबाईल मात्र कुठेही आढळून आला नाही.
दोन सख्ख्या भावांची दगडाने ठेचून हत्या : चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 9:08 PM
दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेल्लारपारच्या जंगलात सात दिवसांनी आढळले मृतदेह