लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेली एक महिला व दुसरा एक पुरुष रुग्ण पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, महिला रुग्ण परत आली; परंतु दोन दिवस होऊनही पुरुष रुग्णाचा अद्यापही शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ जुलै रोजी कोंढाळी येथील ५३ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले. १२ जुलै रोजी सायंकाळी डॉक्टरांचा वॉर्डात राऊंड झाला तेव्हा हा रुग्ण जागेवर नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात शोधाशोध केल्यावर रुग्ण कुठेच आढळून आला नाही. यामुळे पोलिसांकडे याविषयी तक्रार करण्यात आली. विशेष म्हणजे सलग दोन दिवस होऊनही या पॉझिटिव्ह रुग्णाचा शोध न लागल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा भार वाढला आहे. दुसरी पळून गेलेली नंदनवन येथील महिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी या महिलेच्या ओळखीच्या एका रुग्णाला सुटी झाली तर या महिलेला १३ जुलै रोजी सुटी होणार होती. परंतु ही महिला १२जुलै रोजी त्या ओळखीच्या रुग्णासोबत घरी गेली. या दिवशी सायंकाळी डॉक्टरांनी राऊंड घेतला तेव्हा ही महिला वॉर्डात नसल्याचे आढळून आले. घरी फोन केल्यावर ही महिला घरी पोहचली होती. तिला तातडीने रुग्णालयात बोलावून घेतले. रविवारी पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधून एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला होता. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली जबाबदारी ओळखावी. आपल्यामुळे इतरांना आजाराची लागण होऊ शकते, पळून गेल्याने गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
मेडिकलमधून पळाले दोन कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:10 AM
मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेली एक महिला व दुसरा एक पुरुष रुग्ण पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, महिला रुग्ण परत आली; परंतु दोन दिवस होऊनही पुरुष रुग्णाचा अद्यापही शोध सुरू आहे.
ठळक मुद्देएक मिळाली, दुसऱ्या रुग्णाचा शोध सुरूच