लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यात नागपूरकर थंडीने हुडहुडत असतात, असा दरवर्षीचा अनुभव असला तरी यंदा मात्र थंडी पळाली आहे. अशातच हवामान विभागाने येते दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे. दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. त्याचा परिणाम चणा आणि गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा अवकाळीचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे भाजीपाला पीक सडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दरवाढीचा फटका बसू शकतो. टमाटरच्या दरातही अचानकपणे वाढ झाली आहे.
विदर्भात पाऊस
मागील २४ तासातील नोंदीनुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान मागील २४ तासात गडचिरोलीत २०.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. या सोबतच अकोला १.९, अमरावती १.०, नागपूर २.६ आणि यवतमाळ जिल्ह्यात २.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील २२ व २३ हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.