लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण यावे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशांनुसार उपराजधानीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शनिवार व रविवारी ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ राहणार असून, शुक्रवारी रात्री ८ पासूनच त्याची सुरुवात झाली. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यादृष्टीने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत दोन दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन राहणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कडक नियमावली जारी करण्यात आली होती. नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवाअंतर्गत येणाऱ्या आस्थापनाच सुरू राहणार आहेत. ठोस कारणाविना कुणालाही घराबाहेर फिरता येणार नाही. कुणी घराबाहेर पडलेच तर संबंधित पुरावा सोबत बाळगावा लागणार आहे.
रेस्टॉरेन्ट्समधून केवळ ‘फूड डिलिव्हरी’
कडक निर्बंधांदरम्यान नागरिकांना रेस्टॉरेन्ट्समध्ये जाऊन ‘पार्सल’ घेण्याची मुभा होती. परंतु शनिवार व रविवारी केवळ होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ‘डिलिव्हरी’ सेवा सुरू राहणार आहे.
६६ ठिकाणी नाकाबंदी
शुक्रवारी रात्रीपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरात ६६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली, तर अडीच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ला बंदोबस्तावर राहतील.
विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई : पोलीस आयुक्त
‘वीकेण्ड लॉकडाऊन’दरम्यान विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कडक निर्बंधांचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गुरुवार-शुक्रवारी पोलिसांनी शहरात जागोजागी ‘रूट मार्च’ काढून कडेकोट बंदोबस्ताचे संकेत दिले आहेत. ‘वीकेण्ड लॉकडाऊन’च्या माध्यमातून संसर्गावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी व्यापारी संघटनांची चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस व प्रशासनाला सहकार्य करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या विरोधामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे व लोक विनाकारण रस्त्यांवर येत आहे. आता जर विनाकारण विरोध किंवा आंदोलन झाले तर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या लोकांनाच घराबाहेर निघण्याची परवानगी
- वैद्यकीय इमर्जन्सी
- लसीकरण
- उपचार
- विमान, रेल्वे, बसचे प्रवासी
- परीक्षार्थी