- नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वेगवेगळ्या आरोपात पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागपूर आणि दारव्हा (जि. यवतमाळ) येथे या दोन घटना घडल्या. अवघ्या २४ तासात घडलेल्या ‘डेथ इन कस्टडी’ च्या या दोन प्रकरणांमुळे दोन्ही ठिकाणचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, चाैकशीचा संभाव्य अहवाल आणि त्याच्या गंभीर परिणामांची कल्पना असल्यामुळे पोलीस दल हादरले आहे.
बुधवारी, ७ जुलैला रात्री पारडी चाैकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पारडीतील भवानी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमागे राहणारा मनोज ठवकर नामक दुचाकीचालक पोलिसांचा इशारा दुर्लक्षित करून पुढे निघाला. त्यामुळे त्याला अडवण्यासाठी पुढे सरसावलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांना कट लागून ते खाली पडले. ढोबळेंना दुखापत झाल्यामुळे पोलिसांनी मनोजला पकडून बेदम मारहाण केली. त्याला पारडी ठाण्यात नेऊन बसवले. दिव्यांग असलेला मनोज या प्रकारामुळे प्रचंड दडपणात आला. त्यामुळे की काय मनोजचा मृत्यू झाला. कोणताही आरोप नसताना, कोणताही गुन्हा दाखल झाला नसताना पोलीस ठाण्यात मनोजचा मृत्यू झाल्याने प्रकरण ‘डेथ इन कस्टडी’ ठरले. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी सीआयडीने सुरू केली असून गेल्या ३६ तासात ज्या ठिकाणी घटनेची सुरुवात झाली त्या ठिकाणापासून पोलीस ठाण्यापर्यंतचे बहुतांश सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. नाकाबंदीच्या वेळी घटनास्थळी असलेले पोलीस, त्या भागातील नागरिक आणि ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तक्रार आणि चाैकशीच्या निमित्ताने पोलीस ठाण्यात आलेल्यांच्या नावाची सीआयडीने यादी तयार केली आहे. त्यातील काही जणांचे जबाबही दोन दिवसात नोंदविण्यात आले आहे. इन्क्वेस्ट पंचनामा कॉपी सीआयडीने मिळवल्याची माहिती असून पोस्टमार्टम रिपोर्टची सीआयडीला प्रतीक्षा आहे.
दारव्हा (यवतमाळ) पोलिसांच्या कस्टडीत मंगळवारी, ६ जुलैला असाच प्रकार झाल्याचा आरोप आहे. दारव्हा पोलिसांनी मंगळवारी रात्री शेख इरफान शेख शब्बीर, शेख गोलू शेख शब्बीर, आमीर खान शामीर खान या तिघांना ताब्यात घेतले. यातील शेख इरफानचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. त्यामुळे तेथील वातावरण चिघळल्याने अमरावती सीआयडी युनिटकडे या प्रकरणाची चाैकशी सोपविण्यात आली आहे.
---
... तर प्रचंड अडचणी ।
मनोजला ताब्यात घेऊन ठाण्यात आणणारे पीएसआय मुकेश ढोबळे तसेच नायक नामदेव चरडे आणि अंमलदार आकाश शहाणे या तिघांची नियंत्रण कक्षात गुरुवारीच बदली करण्यात आली. दारव्ह्याच्याही ठाणेदारासह पाच जणांची बदली झाली. या दोन्ही प्रकरणात शवविच्छेदन अहवाल महत्वाचा ठरणार आहे. शरीरावर गंभीर जखमा आणि मारहाणीमुळेच मृत्यू झाला, असे वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी नमूद केल्यास ही मंडळी सेवेतून बरखास्त केली जातील. त्यांना ‘डेथ इन कस्टडी’च्या आरोपाखाली अटक केली जाईल अन् त्यांच्यावर खटला चालविला जाईल. वैद्यकीय अहवालासोबतच ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून कोर्टात सादर केले जाईल आणि त्याआधारे संबंधित पोलिसांना शिक्षाही होऊ शकते. ही सगळी कल्पना असल्याने पोलीस दल हादरले आहे.
---
आमचा तपास सुरू -एसपी, सीआयडी
एसओपी प्रमाणे आमचा तपास सुरू आहे. अनेकांचे जाबजबाब नोंदविण्यात आले असून, अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर कारवाईची रुपरेषा ठरणार असल्याचे नागपूर सीआयडीच्या एसपी राजलक्ष्मी शिवणकर यांनी सांगितले. अशीच काहीशी माहितीवजा प्रतिक्रिया अमरावती सीआयडी एसपी अमोघ गावकर यांनी दिली.
---