नागपूर : सत्र न्यायालयाने रेमडेसिविरसह इतर औषधांच्या काळाबाजार प्रकरणात आरोपी शुभम सत्यनिवास अर्जुनवार (२४) व ज्योती ऊर्फ जिया उत्तमसिंग अजित (२३) यांना ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. पी. बी. घुगे यांनी हा निर्णय दिला.
अर्जुनवार हा नागेश्वरनगर, पारडी तर, ज्योती ही शिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. ज्योती गायकवाड पाटील कोरोना सेंटरमध्ये कार्यरत होती. दरम्यान, तिने या सेंटरमधील रेमडेसिविर, कोविफोर यासह इतर इंजेक्शन चोरले. या आरोपींना १८ एप्रिल २०२१ रोजी वाठोडा घाटाजवळ ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून रेमडेसिविरसह इतर इंजेक्शनच्या पाच कुप्या आढळून आल्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक युवराज सहारे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. ज्योती वजानी यांनी कामकाज पाहिले.