रामटेक (नागपूर) : साक्षगंधाचा कार्यक्रम आटाेपून गावी परत जात असताना विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावर गुरुवारी (दि. १६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रशेखर मुरलीधर कोठे (३४) व दादाराम दिलीराग हारोडे (५१) दाेघेही रा. रेवराल, ता. मौदा अशी मृतांची नावे आहेत. रामटेक शहरात गुरुवारी जगदीश कोठे, रा. रेवराल, ता. माैदा यांचा मुलगा अंकित याच्या साक्षगंधाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. चंद्रशेखर व दादाराव या कार्यक्रमासाठी रामटेक शहरात आले हाेते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दाेघेही एमएच-४०/यू-३९७२ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेकहून रेवराल येथे जाण्यासाठी निघाले.
दाेघेही रामटेक शहरापासून काही अंतरावर जाताच तुमसरहून रामटेकच्या दिशेने वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली आणि वाहन लगेच निघून गेले. यात दाेघांच्याही डाेक्याला गंभीर दुखापत झाली, तर चंद्रशेखरचा पाय तुटला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. ताेपर्यंत दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी लगेच पंचनामा करून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
रेवराल येथे शाेककळा
माेटरसायकलच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाल्याने वाहनाच्या धडकेची तीव्रता लक्षात येते. अपघातातील मृत चंद्रशेखर काेठे हा जगदीश काेठे यांचा नातेवाईक हाेय. शिवाय, दादाराव देखील रेवराल येथील रहिवासी हाेता. जगदीश काेठे यांच्या मुलाच्या साक्षगंधाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना अपघात झाला आणि त्यात दाेघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे साक्षगंधाच्या आनंदावर विरजण पडले, तर दुसरीकडे रेवराल येथे शाेककळा पसरली हाेती.