उच्च न्यायालयाचा नव्याने निर्णय देण्याचा आदेश
नागपूर : एकाच अटकपूर्व जामीन अर्जावर दोन वेगवेगळ्या तारखांना परस्परभिन्न निर्णय देण्याचा प्रकार नागपूर सत्र न्यायालयामध्ये घडला. त्यापैकी एका निर्णयाद्वारे दोन आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला तर, दुसऱ्या निर्णयाद्वारे अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन सदर प्रकारामुळे नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास कमी व्हायला नको असे मत व्यक्त केले. तसेच, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संबंधित अटकपूर्व जामीन अर्ज नव्याने गुणवत्तेवर सुनावणी घेऊन सात दिवसात निकाली काढावा असा आदेश दिला.
प्रकरणावर न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जरीपटका येथील अरुण कोटांगळे आत्महत्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी प्रकाश गायकवाड व नीरज सोनी यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला या न्यायालयाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी तो अर्ज खारीज केला. त्यानंतर ३ जानेवारी २०२० रोजी तोच अर्ज मंजूर करण्याचा निर्णय दिला. परिणामी, कोटांगळे यांच्या पत्नी विद्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सत्र न्यायालयाने ३ जानेवारी २०२० रोजी दिलेला वादग्रस्त निर्णय रद्द करण्याची विनंती केली. तसेच, सत्र न्यायालयाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या निर्णयाकडेही उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर उच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०२१ रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना दिले होते. त्यांच्या चौकशीमध्ये विद्या यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. परिणामी, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा ३ जानेवारी २०२० रोजीचा वादग्रस्त निर्णय रद्द करून वरीलप्रमाणे आदेश दिला. विद्या कोटांगळेतर्फे ॲड. आर. एच. रावलानी यांनी कामकाज पाहिले.