नागपूर : मेडिकलमधील मोकाट कुत्र्यांनी रविवारी दोन तासांत दोन डॉक्टराचे लचके तोडल्याच्या प्रकरणाने मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. मनपा प्रशासनेही तत्परता दाखवित सोमवारी दिवसा व रात्रीही कुत्रे पकडण्याची मोहिम राबवली. रात्री उशीरापर्यंत १०वर कुत्रे पकडले.
मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या परिसरात कुत्र्यांचा हैदोसाचे अनेक प्रकरणे आहेत. परंतु कोणीच याला गंभीरतेने घेत नव्हते. मात्र आठवड्याभरात कुत्रे चावण्याचा चार घटना समोर आल्याने आणि यात दोन महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याने यंत्रणा सर्तक झाली. या दोन्ही डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे. यातील एक डॉक्टरला सुटी देण्यात आली, तर दुसºया डॉक्टरांवर वॉर्डात उपचार सुरू आहेत.
-मेडिकलच्या परिसरात १००वर मोकाट कुत्रे
मेडिकलच्या परिसरात १००वर मोकाट कुत्रे असल्याची माहिती आहे. हे कुत्रे झुंडने राहतात. याच्या सर्वात जास्त वावर रुग्णालयाच्या आत असतो. विशेषत: स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या परिसरात सर्वाधिक कुत्रे दिसून येतात. त्यामुळे येथील रुग्णांसोबतच नातेवाईकांमध्ये नेहमीच भितीचे वातावरण असते. त्यांच्या घाणीमुळे सफाई कर्मचारीही त्रस्त असतात. विशेष म्हणजे, कॉलेज परिसरातही कुत्रे दिसून येतात. काही दिवसांपूर्वी शरीररचना शास्त्र विभागातील एका वरीष्ठ डॉक्टरांच्या मागे कुत्रे धावले. परंतु त्यांनी आरडोओरड केल्याने कुत्रे पळून गेले.
- रात्री कुत्र्यांचा सुळसुळाट
मेडिकलच्या परिसरात रात्रीच्यावेळी कुत्र्यांचा सुळसुळाट राहत असल्याचे अनेक कर्मचाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले. रात्री मोकाट कुत्र्यांमुळे डॉक्टरांपासून ते रुग्ण व नातेवाईकांपर्यंत सर्वच त्रस्त असतात. त्यांना हाकलून लावल्यानंतरही ते पुन्हा पुन्हा येतात.
-नातेवाईक, कर्मचारी, काही संस्था देतात कुत्र्यांना अन्न
रुग्णाचे नातेवाईक उरलेले अन्न कुत्र्यांना खाऊ घालतात. सामाजिक संस्थांचे लोकही मेडिकलच्या पसिरातील मोकाट कुत्र्यांना खाऊ घालताना दिसून येतात. काही कर्मचाºयांनी तर कुत्रे पाळल्याचीही माहिती आहे. परिणामी, मेडिकल परिसरात कुत्र्यांची दहशत व संख्या वाढत आहे.
-दोन पथकाकडून कुत्रे पकडण्याची मोहिम
मनपा उपायुक्त डॉ. गजेंद्र महाल्ले यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सोमवारी मेडिकलमध्ये दोन पथकाकडून कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेण्यात आली. दिवसा सात कुत्रे पकडण्यात आले. ही मोहिम रात्रीही राबविण्यात आली. उशीरापर्यंत ही संख्या दहावर गेली. ही मोहिम पुढील काही दिवस राबविली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
- सापाचीही दहशत
मेडिकलचा बहुसंख्य परिसर हा झाडीझुडपांनी वेढलेला आहे. यामुळे नेहमीच साप निघतात. नुकतेच ‘मेट्रन’ यांच्या क्वॉर्टरमध्ये विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही वॉर्ड ४९ मध्ये नाग निघाला होता. यामुळे कुत्र्यां सोबतच साप पकडण्याची मोहिमही राबविण्याची मागणी होत आहे.