नागपूर : पाटणसावंगी व वारेगाव शिवारात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोलार नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. तरुण मात्र मासेमारी करताना बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना सोमवारी (दि. ११) घडल्या असून, मंगळवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आल्या.सुमित्राबाई ऊर्फ शांताबाई मुरलीधर दशमुखे (८०, रा. शिवाजी चौक, पाटणसावंगी, ता. सावनेर) व मोहम्मद नईम अन्सारी (२५, रा. पिवळी नदी, शिवनगर, टेकानाका, नागपूर), अशी मृतांची नावे आहेत. सुमित्राबाई सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी येथील कोलार नदीच्या घाटावर पूजेचे साहित्य विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. येथील पुलावर उभ्या असताना त्यांचा तोल गेला आणि त्या पात्रात पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या बुडाल्या व वाहत गेल्या. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. काही अंतरावर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
दुसरी घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव (ता. कामठी) शिवारात घडली. मोहम्मद नईम अन्सारी हा त्याच्या मित्रांसोबत वारेगाव शिवारातील कोलार नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी आला होता. नदीत मासेमारी करीत असताना तो प्रवाहात आला आणि वाहत गेला. त्याचे दोन मित्र कसेबसे बाहेर आले. त्याचाही मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे सावनेर व खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनांचा तपास अनुक्रमे कॉन्स्टेबल संदीप नागरे व सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.