आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत मौदा तहसीलमध्ये झालेल्या बोअरवेल घोटाळाप्रकरणी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन शाखा अभियंत्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे विभागात चांगलीच दहशत पसरली आहे. आणखी दोन कर्मचाºयांवर गाज पडणार असल्याची माहिती आहे.शाखा अभियंता दिलीप धनराज सावरकर व गजानन राजकारणे यांना निलंबित करण्यात आले आहे. मौदा तालुक्यात बोअरवेलच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार अध्यक्ष निशा सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत बोअरवेलसाठी वापरण्यात येणारे केसिंग पाईप दर्जाहीन वापरल्याचे निदर्शनास आले होते. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. वेळोवेळी हा विषय जि.प.च्या सभांमध्ये गाजत होता.मौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलया प्रकरणात राजकारणे व सावरकर यांच्याविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात शासनाची फसगत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीईओंनी केलेल्या चौकशीत दोघांविरुद्ध अनुशासन भंग केल्याचेही आढळले आहे. जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांनी दोघांविरु द्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण आणखी चर्चेत आले होते. सीईओंनी कंबोडिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेला जाण्यापूर्वी दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.