नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांमधील १२ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि युनिट ४ च्या पथकाने गजाआड करून ५ लाख ६८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या घटनेत गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक बुधवारी २७ मार्चला रात्री ११.३० वाजता कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने समतानगर मलका कॉलनी जवळील मोकळ््या जागेत कारवाई केली असता आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत कारमध्ये बसून होते.
पोलिसांनी आरोपी शुभम रजनिश सेन (२४, रा. बाबा दिपसिंहनगर, कपिलनगर), मनिष उर्फ अनिकेत रामदयाल डोमळे (२३, रा. बाबा दिपसिंहनगर), चंद्रशेखर रामनरेश शाहु (२५, रा. कुशीनगर जरीपटका), मोहम्मद फेजान मोहम्मद रियाज (२३, कुलर कारखान्यासमोर शांतीनगर), मोहम्मद इरफान मोहम्मद शब्बान (२३, रा. पिटेसुर) हे प्राणघातक शस्त्र घेऊन फियाट कार क्रमांक एम. एच. ४३, ए. बी-७३०६ मध्ये संशयास्परित्या बसले होते. यातील आरोपी अभिषेक कडबे (रा. समतानगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन लोखंडी चाकु, एक लाकडी दांडा, मिरची पावडर, दोरी, पाच मोबाईल, एक फियाट कार असा एकुण ३ लाख ६६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४, २५, सहकलम १३५ नुसार गु न्हा दाखल करून आरोपींना कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.नंदनवन परिसरातही टोळीला अटकनंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी रविराज बघेल (२५, रा. शिवनकरनगर झोपडपट्टी, नंदनवन), कार्तीक वामन रागवते (२४, रा. शिवसुंदरनगर दिघोरी), अनुज जनार्दन आर्डक (२५, रा. शेषनगर), अभिजीत ओमेश्वर देशमुख (२३, रा. आराधनानगर), उमेश दिनेश राऊत (२८, रा. शेषनगर), मोहम्मद आझाद मोहम्मद काशीम अंसारी (२७, रा. नंदनवन झोपडपट्टी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून दोन प्राणघातक शस्त्र, मिरची पावडर, दोरी, पाच मोबाईल, तीन दुचाकी असा २ लाख १ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.