नागपूर : पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना अराेली (ता. माैदा) शिवाजीनगर, तुमान शिवारात मंगळवारी (दि. ५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. त्या दाेघींचेही मृतदेह आढळून आले आहेत.
सुजाता धर्मा उईके (१९) व मनीषा रामप्रसाद ईनवाते (१८, दाेघीही रा. शिवाजीनगर, तुमान, ता. मौदा) अशी मृत मुलींची नावे आहेत. तुमान शिवारातून पेंच धरणाचा डावा कालवा भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या दाेघीही मंगळवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे कालव्याच्या काठी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या हाेत्या. चारा खात असतानाच एक बकरी कालव्यात पडली. त्यामुळे बकरीला वाचवण्यासाठी दाेघेही पुढे सरसावल्या.
बकरीला वाचवीत असताना दाेघीही कालव्यात पडल्या व प्रवाहात आल्याने वाहत गेल्या. दाेघीही मंगळवारी रात्रीपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या वडिलांनी त्या बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळी शाेधकार्य सुरू करण्यात आले. सुजाताचा मृतदेह बुधवारी पारडी (कला) (ता. माैदा) शिवारात तर मनीषाचा मृतदेह गुरुवारी (दि. ७) दुपारी रेवराल (ता. माैदा) शिवारातील कालव्यात आढळून आला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फौजदार हंसराज वरखडे करीत आहेत.